चौक / प्रतिनिधी :- नवी मुबंई येथील श्री स्वामिनारायण गुरुकुल आंतरराष्ट्रीय शाळेतील इयत्ता ९ वीचा विद्यार्थी समीर सायब याने नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय MET-Olympiad मध्ये तिसरा क्रमांक मिळवून महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. ही परीक्षा भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत भारत हवामानशास्त्र विभाग (IMD), नवी दिल्ली (HQ) च्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आली होती.
१४ जानेवारी २०२५ रोजी भारत मंडपम, नवी दिल्ली येथे भारतीय हवामान विभागाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह डॉं. जितेंद्र सिंग आणि प्रो. सेलेस्टे साऊलो (जागतिक हवामान संघटनेचे सरचिटणीस) या सोहळ्यात सहभागी झाले होते. नवी दिल्ली येथील मौसम भवन येथे आयोजित एका विशेष समारंभात शास्त्रज्ञांच्या हस्ते कुमार समीर सायब याला पुरस्कार प्रदान करण्यात आला. समीरला IMD च्या शास्त्रज्ञांनी मौसम भवन येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा देखील दिली. डॉं. मृत्युंजय महापात्रा, आयएमडीचे डीजीएम आणि जागतिक हवामान संघटनेचे तिसरे उपाध्यक्ष यांच्यासह नामवंत शास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांना भेटण्याची संधीही त्याला मिळाली.
त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल श्री स्वामिनारायण गुरुकुल नवी मुबंई शाळेचे संचालक परमपूज्य विश्वमंगलदास स्वामीजी, ब्रम्हस्वरूपदास स्वामीजी, शाळेचे मुख्याध्यापक डॉं. पी. हरिबाबू रेड्डी सर, शाळेचे सर्व शिक्षक, पालक आणि मित्रमंडळींनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.
