पराभवाच्या धक्क्याला थांबवून नव्या संकल्पाची सुरुवात!

 


* सुधाकर घारे यांच्या नव संकल्प सभेने दिला जोशाचा नवा संदेश

कर्जत / प्रतिनिधी :- पराभवाने खचून न जाता नव्या निर्धाराने नव्या संकल्पाचा आरंभ करणाऱ्या सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडीने ‘रडायचं नाही, लढायचं’ या ब्रीदवाक्याने पुन्हा एकदा झंझावाती हाक दिली आहे. कर्जत येथील रॉयल गार्डन हॉलमध्ये सकाळी 11 वाजता ‘नव संकल्प सभेचे’ आयोजन करण्यात आले होते, ज्यात कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाच्या राजकीय वर्तुळात सळसळ निर्माण करणारा उत्साह दिसून आला.

कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघात नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे आणि महाविकास आघाडीचे नितीन सावंत यांच्या तगड्या आव्हानासमोर परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार सुधाकर घारे यांनी मोठ्या निर्धाराने, जनतेचा आशीर्वाद घेत, आपला प्रचार केला. पण थोडक्याच मतांनी पराभव स्विकारावा लागला. या पराभवाने घारे खचले नाहीत. उलट नव्या निर्धाराने, नव्या संकल्पांसह जनतेसमोर उभे राहून "रडायचं नाही, लढायचं!" या आवाहनाने नव संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी अशोक भोपतराव, भरत भगत, भगवान भोईर, भगवान चंचे, अंकित साखरे, राजेंद्र निगुडकर, भाई विलास थोरवे, सुनील गायकवाड, संतोष बैलमारे, रंजना धुळे आणि पूजा सुर्वे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांच्या उत्साही आणि प्रेरणादायी भाषणांनी वातावरण भारावून गेले. “पराभव म्हणजे शेवट नव्हे, तर नव्या विजयाची सुरुवात आहे," या विचारावर सर्वांची एकवाक्यता होती.

सुधाकर घारे यांनी जनतेशी थेट संवाद साधताना स्पष्ट केले की, पराभव हा विजयाच्या दिशेने पहिला पाऊल असतो. आपल्याला आता थांबायचं नाही. पराभवाने शिकवण मिळाली आहे, तो शिकून नव्या जोमाने आपल्याला पुढे जावे लागणार आहे. माझे ध्येय अजूनही स्पष्ट आहे, आणि आपली लढाई अजून संपलेली नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या या प्रेरणादायी वक्तव्यांनी उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन विकास आघाडीचे कार्यकर्ते नव्या संकल्पाने एकत्र येऊन पुढील रणधुमाळीत उतरतील, असा विश्वास जनतेला वाटला.

सभेत मान्यवरांनी सुधाकर घारे यांचे कौतुक करीत, त्यांचा लढाऊ बाणा आणि जनसेवेची तळमळ उधळून दिली. अशोक भोपतराव यांनी “सुधाकर घारे यांनी दिलेला संदेश प्रत्येकाला प्रेरणा देईल, पराभवाने घाबरून मागे हटायचे नाही. ते लढवय्ये आहेत, असे म्हटले. भरत भगत, भगवान भोईर आणि बाकीच्या मान्यवरांनीही त्याच विचारांना पाठिंबा दिला.

या सभेत विशेषतः महिलांचा आणि तरुणांचा सहभाग लक्षवेधी ठरला. पूजा सुर्वे आणि रंजना धुळे यांनी महिला सक्षमीकरणाबद्दल आपले विचार मांडले. नव्या युगात महिलांची भूमिका महत्त्वाची आहे आणि या नव संकल्पाच्या लढाईत महिलांना पुढे येणं गरजेचं आहे, असे त्यांनी म्हटले. तरुणांनीही या सभेत जोशाने सहभाग नोंदवून परिवर्तनाचा ध्वज उंचविण्याचे वचन दिले.

सभेचा समारोप होताना सुधाकर घारे यांनी स्पष्ट केले की, ही सभा नव्या सुरुवातीचे प्रतीक आहे. रडण्याचा काळ संपला, आता फक्त लढाई आहे. जनता आपल्यासोबत आहे आणि आगामी निवडणुकीत आपण नक्की विजय मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली झालेली ही सभा परिवर्तन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांसाठी ऊर्जेचा स्रोत ठरली आहे. ज्या जोशाने आणि आत्मविश्वासाने त्यांनी आपले विचार मांडले, त्याने जनतेलाही नव्या संकल्पासाठी उभे केले. यापुढील राजकीय वाटचालीत परिवर्तन विकास आघाडीचे नाव नक्कीच घेतले जाईल, असे दिसते.

Post a Comment

Previous Post Next Post