मालवणच्या सांस्कृतिक वैभवात मानाचे स्थान असलेले सरस्वती चित्रमंदिर बंद पडले अन् काळजात एक विलक्षण कालवाकालव झाली. आयुष्याच्या स्वप्नवत कालखंडात जीवनाचा एक भाग असलेले हे चित्रमंदिर बंद पडले अन् आपण एक जवळची प्रिय व्यक्ती गमावल्याची भावना झाली. खर म्हणजे मालवणातील एकेकाळी तरुणाईचा स्वर्ग असलेले हे थिएटर्स बंद झाले तरी कुठल्याही स्थानिक वृत्तपत्रात त्याची दखल घेतली नाही.आजकालच्या व्यवहारी बनलेल्या वृत्तपत्रीय क्षेत्रात असल्या सांस्कृतिक घडामोडींना कुठे स्थान आहे. गल्लीतल्या पुढा-यांची पत्रकबाजी, गावचे आठवडा बाजार, नेत्यांचे वाढदिवस विशेष, गावातील जत्रा विशेष आणि शिक्षकांचेही बाजारीकरण करण्याच्या चालू वृत्तपत्रीय क्षेत्रात या सांस्कृतिक लेखांना जाहिराती कुठे मिळणार?
सरस्वती चित्रमंदिर हे मालवणच्या तरुणाईचे एक स्वप्न होते. मालवणची एक विशेष ओळख होती. अनेक तालुक्यांच्या ठिकाणी टुरिंग टॉकीज असताना एक छोटेसे पण टुमदार थिएटर मालवणला असणे म्हणजे एक जवळ होते. थिएटरात लागलेल्या चित्रपटांइतकीच आगामी आकर्षण असलेल्या चित्रपटांची लज्जतदार चर्चा व्हायची. साधारणत: दिलीप, राज, देवानंदच्या जमान्यात सुरु झालेल्या चित्रपटगृहाने राजेश खन्नाचे प्रणयी जग अनुभवले. अनेक प्रणयी युगुले पडद्यावरच्या प्रणयात स्वत: शिरले. नंतर आलेल्या अमिताभ नावाच्या तुफानी झंझावाताने सारे थिएटर हादरुन जायचे. दिवार मधल्या भावपुर्ण डायलॉगबाजीने प्रेक्षकात सन्नाटा पसरला जायचा.
ग्रामीण भागातील प्रेक्षकांसाठी खास पौराणिक शो लावायचे. सखु आणि पंढरपूरला ग्रामीण प्रेक्षकांनी तुफान गर्दी केली. राम और श्याम, हाथी मेरे साथी, पिंजरा आणि दादा कोंडकंच्या अनेक चित्रपटांनी गर्दीचे रेकॉर्ड केले. दिवाळीला लागणा-या चित्रपटांची अगोदरच दोन तीन महिने ओरड पडायची. प्रत्येक जण अगदी आतल्या गोटातील बातमी सांगावी तशी चित्रपटांची नाव सांगायचा. प्रत्यक्षात वेगळाच चित्रपट लागायचा. दिवाळीचा चित्रपट मात्र हमखास 2 आठवड्यानंतरही गर्दी खेचायचा त्यावेळी शनिवार-रविवारी ग्रामीण भागातील प्रेक्षकांची सोय म्हणून दुपारचा 3 चा शो लावला जात असे. या शोला तारकर्ली, देवबाग, वायरी, कोळंब इ. गावातील लोक प्रचंड गर्दी करायचे. आम्ही तारकर्ली देवबागचे प्रेक्षक भरडावर एसटीतून उतरलो की बातमी मिळायची, लाईन रस्त्यावर आली आहे. काळजाचा ठोका चुकायचा,मात्र सरस्वती चित्रमंदिर मालक मोरे पितापुत्र आमची कधी निराशा करायचे नाहीत. तारकर्ली देवबागच्या प्रेक्षकांसाठी काहीही करुन घाऊक तिकीटे उपलब्ध करुन देत.
सरस्वती चित्रमंदिराभोवती त्यावेळचे वातावरण भारलेले असायचे. चित्रपटाबद्दल प्रचंड उत्सुकता, कोणी कोणाला अभिनयात खाल्ले यावर प्रचंड वादावादी, तरुणाईचा थाटमाट , प्रेमी युगुलांचे लपतछपत वागणे, एखाद्या सुंदर चेह-याकडे अनेकांच्या खिळलेल्या नजरा, हास्यविनोद, याने चित्रपटगृहाच्या परिसरात जणू जत्राच भरायची. तिकीटासाठी दोन दोन तास लोक उभे रहायचे. मालक सायकलवरुन आले की वातावरण एकदम टेन्स व्हायचे. पुढचे लोक खुशीत असायचे तर पाठीमागचे लोक दैवावर भरोसा ठेवायचे. मग थोडेफार ब्लँकचे प्रकार व्हायचे. पण एकूण सगळा व्यवहार खिशाला परवडणारा होता. कारण तिकीटांचे मुळातले दर अगदी गरिबातल्या गरिबालाही परवडणारे होते.
मुंबईहून जाऊन आलेले अर्धेमुर्धे चाकरमानी कधीकधी मोठ्या गमज्या मारायचे, हे कसले टॉकीज, हा तर डबा, ठिगळाएवढा पडदा, मुंबईला येऊन बघा, आम्हालाही काही काळ त्याची असूया वाटायची. वास्तविक मालवण आणि मुंबई यांची तुलना करणे मुर्खपणाचं हेही समजत होते. पण मी प्रत्यक्षात मुंबईतल्या काही थिएटर्सची अवस्था पाहिली अन् वाटले, आपले सरस्वती चित्रमंदिर खुपच छान आहे रे बाबा!
सरस्वती चित्रमंदिराची तशी आपली काही खास वैशिष्ट्ये होती. बाल्कनी ही फक्त स्त्रियांसाठी होती आणि त्याचे तिकीटाचे दर अगदी सामान्य होते. बॉक्सचे दर सर्वात जास्त. बॉक्समध्ये बसणा-या प्रेमी युगुलांची तपासणी तर पहाण्यासारखी होती. मालवण हे शहर तसे छोटेखानी असल्याने बहुतेक लोक एकमेकांना परिचित. मग प्रेयसी आधी येऊन बसायची आणि काळोख केला की प्रियकर येऊन बसायचा. बॉक्सच्या पुढच्या रांगेतील लोकांच्या नजरा पडद्यावर अन् कान मागून येणा-या च्यॅक आवाजावर. तरीही हा प्रकार मर्यादित खेळकर होता. एका मर्यादेपलीकडे या प्रकारांनी सीमा ओलांडल्या नाहीत.
आज मागे वळून पाहताना आठवणींचे कारंजे उसळतात, मनाला गोंजारतात, तारुण्यातल्या फुलपाखरी दिवसातले ते विहंगणे मनाला उभारी देतात. मात्र आज सरस्वती टॉकीजच्या समोरच्या रस्त्याने जाताना थिएटरची अवस्था पाहताना मन भरुन येते. पराक्रमी राजांच्या काळात गजबजलेल्या वैभवशाली राजवाड्यांची नंतर भग्नावस्थेतील अवस्था पाहताना जशी, तशीच घालमेल होते.
वर्षाला दोन दोन मोबाईल बदलणा-या या नवीन पिढीला कुठल्याच गोष्टीला कायम कवटाळून राहण्याची सवय नाही. आमची पिढी मात्र अशा आठवणींना कवटाळून पुढे चालत असते. सरस्वती चित्रमंदिराला माझ्याही हृदयात एक ठळक स्थान आहे.
("हृदयाचा एक कोपरा सरस्वती चित्रमंदिरासाठी" हा लेख सन 2013 च्या जनयुगच्या दिवाळी विशेष अंकामध्ये छापण्यात आला होता...लेखक - रमाकांत ज्ञानदेव मोंडकर)
सध्या रोजचा पेपर मोबाईलवर वाचणा-या आणि इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेल्यांना दिवाळी अंक आणि जुने मालवण कळावे म्हणून हा पोस्टप्रपंच.
