खोपोली शहरातील गल्लोगल्ली घंटागाडी फिरत असताना कचऱ्याचे ढीग रस्त्यांवर ?

 


* घाणीच्या ढिगाऱ्यामुळे रोगराईला आयते आमंत्रण...

खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली शहर निसर्गाच्या सुंदरतेने नटलेले शहर आहे. या शहरालगत देशात मानलेले दोन मोठे महामार्ग जातात. तसेच हिरवेगार डोंगर, त्यावर पाण्याचे वाहते सुंदर झरे, बारामाही धो-धो वाहणारी पातळगंगा नदीत मिळतात पण या पाताळगंगा नदीच्या पाण्याला दूषित करणारे गटाराचे सांडपाणी नगर परिषद प्रशासनच्या डोळ्यांदेखत रस्त्यांवर जागोजागी कचऱ्यांचे ढीग सुंदरतेला नष्ट करीत असल्याचे दिसून येत आहे.

दरवर्षी नगर परिषदेकडून कोट्यवधी रुपये खर्च करूनही शहरातील अनेक भागांत स्वच्छतेचे तीन-तेरा वाजले आहेत. सफाई ठेकेदाराच्या दुर्लक्षामुळे शहराची अवस्था बिकट झाली आहे. शहराच्या काही भागात आज ही कचऱ्याचे ढीग साचले आहेत. तसेच शहरात स्वच्छतेची योग्य व्यवस्था नसल्यामुळे कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे नागरिकांना आजारांना सामोरे जावे लागत असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.

नगर परिषदेकडून ठेकेदारी देऊन घंटागाड्याची सोय करण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही अनेक भागात मुख्य रस्त्याच्या कडेलाच जागोजागी कचऱ्याचे ढीग साठल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत. हा कचरा करण्यात नागरिकांसह दुकानदारांचाही हातभार लागत आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर कचरा साचत असून, याची स्वच्छता करण्यात येत नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र, स्वच्छता विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. खोपोली नगर परिषद हद्दीत स्वच्छता करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणेची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील कचरा उचलण्यासाठी नगर परिषद महिन्याला लाखों रुपये खर्च करीत आहे. हे स्वच्छता कर्मचारी सकाळपासून सायंकाळपर्यंत स्वच्छता करण्याचे काम करतात. मात्र, असे असतानाही सध्या अनेक प्रभागात जागोजागी कचऱ्याचे ढीग साठल्याचे दिसून येत आहेत. घंटागाड्या कचरा जमा करण्यासाठी गल्लोगल्ली फिरतात. मात्र, काही क्षणात त्या ठिकाणी पुन्हा कचऱ्याचा ढीग तयार होतो. अनेक भागात घंटागाडीत कचरा न टाकता नागरिक चक्क रस्त्याच्याकडेला कचरा टाकून पसार होतात. मात्र अशा भागात नगर परिषद स्वच्छतेविषयी जनजागृती मोहिम राबून आपला प्रभाग स्वच्छ ठेवल्यास आपला सन्मान करण्यात येईल अशी मोहीम का राबवत नाही ? काही लोक रस्त्यावर कचरा फेकून रोगराईला आयते आमंत्रण देतांना दिसून येत आहे. नगर परिषद प्रशासन अशा लोकांवर दंडात्मक कार्रवाई का करीत नाही ? असा प्रश्न खोपोलीकरांमधून होत आहे.

खोपोली नगर परिषद प्रशासनाने खोपोली शहर स्वच्छ होण्यासाठी ठेकेदारी देऊन घंटागाड्या सुरु केल्या आहेत तसेच प्रत्येक प्रभागात सफाई कर्मचारी इमानदारीने स्वच्छता करतात तर शहरातील रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग का दिसून येतात? याचा अर्थ शहरात स्वच्छता होत नाही किंवा नगर परिषद प्रशासनाचा कुठेतरी दुर्लक्षपणा होत आहे. खोपोली शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी खोपोलीकरांनी ही नगर परिषद प्रशासनाला रस्त्यावर कचरा न टाकून थेट घंटागाडीतच कचरा टाकून सहकार्य करून आपला शहर स्वच्छ, सुंदर व रोगराईमुक्त होण्यासाठी मदत करावी व नगर परिषद प्रशासनाने ही जबाबदारीने शहराला स्वच्छ करावे.

- ग्यासूद्दीन खान 

खोपोली शहर अध्यक्ष

आम आदमी पार्टी.

Post a Comment

Previous Post Next Post