* नेरळहुन आलेल्या दोन्ही ट्रेन हाऊसफुल...
माथेरान / दिनेश सुतार :- महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेजवर धावणारी मध्य रेल्वे व प्रवासी पर्यटकांची आवडती मिनिट्रेन 6 नोव्हेंबरपासून सुरू झाली असून पहिल्या दिवशी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पहिल्या फेरीत 111 प्रवासी तर दुसऱ्या फेरीत 102 प्रवासी पर्यटकांनी प्रवास करून या अद्भुत सेवेचा लाभ घेतला. नेरळहून सुटणाऱ्या दोन्ही ट्रेन या बोगिनी भरलेल्या आणि वेळेत आल्या. त्यामुळे पर्यटकांनी या 21 किलोमीटर अंतरावरील निसर्गरम्य सेवेचा मनमुराद आनंद घेतला.
पावसाळी चार महिने सुरक्षेच्या कारणास्तव मिनिट्रेन बंद होती. 15 ऑक्टोबरला मिनिट्रेन सुरू होणार होती पण ऑक्टोबर महिन्यात पावसाने आपले ठाण मांडून ठेवले असल्याने हा महिना सुद्धा हुकला. ऑक्टोबर महिन्यात कुठल्या भागात भूस्खलन किंवा दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत का? याची पाहणी करून हा मार्ग मोकळा करण्यासाठी युध्दपातळीवर कामे केली गेली. हा मार्ग सुरक्षित असल्याचे निदर्शनास येताच नेरळ-माथेरान मार्गांवर ट्रायल घेण्यात आल्या. त्यानंतर 6 नोव्हेंबर रोजी नेरळ-माथेरान ही सेवा पाच महिन्यानंतर पूर्वपदावर आणण्यात मध्य रेल्वेला यश आले आहे.
पाहिली मिनिट्रेन ही सकाळी 8:50 ला नेरळहुन सुटणार होती म्हणून प्रवासी पर्यटकांनी सकाळी 7 वाजल्यापासून रांग लावली होती. मागील तीन दिवसांपासून माथेरानमध्ये आलेल्या पर्यटकांनी ट्रेन सुरू होणार हे ऐकताच माथेरानहून नेरळला जावून रांगेत उभे राहून तिकीट मिळविले व या अद्भुत निसर्गरम्य सफारीचा मनसोक्त आनंद घेत पुन्हा माथेरान गाठले. ही मिनिट्रेन सकाळी 11:25 ला माथेरान स्थानकात दाखल झाली. या ट्रेनला एकूण 6 बोगी लावण्यात आल्या होत्या, त्यामध्ये द्वितीय श्रेणी 3 बोगी, प्रथम श्रेणी 1 बोगी व लगेज आणि ब्रेक या दोन बोगी अश्या लावण्यात आल्या होत्या. यामध्ये 111 प्रवासी पर्यटकांनी सफर केली. यामध्ये द्वितीय श्रेणी 90 आणि प्रथम श्रेणी 21 प्रवासी पर्यटकांनी प्रवास केला.
माथेरानहून पावणे तीन वाजता पहिली ट्रेन सोडण्यात आली ती सुद्धा फुल्ल होऊन निघाली. त्यामुळे नेरळ-माथेरान मिनिट्रेनला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, अमन लॉज-माथेरान या अप आणि डाऊन मार्गांवर धावणाऱ्या शटल सेवाही भरभरून धावत होत्या.
माथेरान मिनीट्रेनचा पहिला दिवस, आम्हाला या अद्भुत सफरीचा आनंद घेता आला. पहिला दिवस असल्याने गाडीची पूजा केली गेली, रुळांची पूजा केली गेली. थोडक्यात आपली परंपरा जपण्याचे काम रेल्वेकडून केले गेले. या सफरीच्या वेळेस रेल्वे कर्मचाऱ्यांनी चांगली माहिती दिली तसेच माथेरानमधील काही लोकांनी धावत्या गाडीतून काही निसर्गरम्य ठिकाणांची माहिती दिली. अतिशय रंजक सफर अनुभवता आला.
- नीलिमा रामचंद्र रईच प्रवासी पर्यटक.