* पक्षश्रेष्ठींच्या आदेशानंतर भाजप नेते किरण ठाकरे यांची माघार
* कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद वाढली
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत-खालापूर विधानसभा प्रमुख भाजप नेते किरण ठाकरे यांनी कर्जत-खालापूर विधानसभेसाठी अपक्ष अर्ज दाखल केल्याने महायुतीतील वाद विकोपाला गेला होता. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप उपनेते रविंद्र चव्हाण यांनी किरण ठाकरे व कर्जत-खालापूर मतदार संघातील प्रमुख पदाधिकारी यांच्याशी चर्चा करीत राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी सर्वांनी मतभेद विसरून कामाला लागावे असे आदेश दिल्याने किरण ठाकरे यांनी अखेरच्या क्षणी माघार घेतली आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आणण्यासाठी एकेक एक शिलेदार महत्वपूर्ण आहे, याची जाणीव पक्षश्रेष्ठींना आहे. यासाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीतील बंडखोर नेत्यांची समजूत काढण्यात येत होती. त्याच अनुषंगाने कर्जत-खालापूर विधानसभेतील बंडखोर भाजप नेते किरण ठाकरे यांची देखील समजूत काढण्यात आली आहे.
किरण ठाकरे म्हणाले की, यावेळी भाजपाला मित्रपक्षांकडून साथ मिळत नसल्याने तसेच भाजपाचे सर्व कार्यकर्ते एकत्र येत मी पक्षाचा व अपक्ष नामनिर्देशन अर्ज भरावा असा कार्यकर्त्यांच्या आग्रह असल्याने, मी माझा नामनिर्देशन अर्ज दाखल केला होता. मात्र पक्षाचे केंद्रीय नेते यांनी पक्षातील ज्यांनी कोणी बंड केला आहे, त्यांनी आपले अर्ज मागे घेण्याचा आदेश असल्याने राज्यातील नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार माझा अर्ज मागे घेतला आहे.
गेली सात वर्ष पक्षात काम केले आहे व ५ वर्षे पक्षाकडे मी कोणतेही पद मागितले नाही. महेंद्र थोरवे आमचे कोणतेही काम करणार नाही, आम्हाला त्रास देतील असे असले तरी पक्षाचा आदेश म्हणून आम्ही महायुतीचे काम करणार, पुढे येणाऱ्या ग्रामपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूका भाजपा स्वबळावर लढवणार असल्याचे किरण ठाकरे यांनी सांगितले आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश कार्यकारणी सदस्य हृषिकेश जोशी, भाजप युवा मोर्चाचे प्रज्ञेश खेडकर, संतोष धुळे, रामदास घरत, जनार्दन म्हसकर, किशोर ठाकरे यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी उपस्थित होते.