* खोपोलीकरांच्या नशिबी कामचुकार अधिकाऱ्यांचा विळखा?* गणेशोत्सव, ईद, दसऱ्यानंतर दिवाळी आली तरी समस्या जैसे थे ?
खोपोली / खलील सुर्वे :- खोपोली नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा पगार, बोनस, पेन्शन, मेडीकल, पीएफ दुपारी तासन्तास जेवणाच्या सुट्ट्या व्हीआयपी केबिन, एसी व्हीआयपी खुर्च्या पाहिजे पण काम नको? खोपोलीकरांच्या नशिबी एकापेक्षा एक कामचुकार अधिकारी या शहराला लाभल्या
ने खोपोली शहराचा अक्षरश: सत्यानाश झाला आहे. पत्रकारांनी माहितीसाठी फोन केल्यावर अधिकारी फोन उचलण्याची तसदी घेत नाहीत... अधिकारी सरकारी नोकर... लोकसेवक...तर पत्रकार लोकशाहीचा चौथास्तंभ... तरीही बेफिकिरी...खोपोली शहरात डोंगरभर समस्या असताना हे अधिकारी नक्की कोणत्या व कुणाच्या कामात व्यस्त आहेत ? असा जनतेचा सवाल आहे. खोपोली नगर परिषदेच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांच्या कारभाराची चौकशी व्हावी अशी मागणी पत्रकारांसह जनतेतून होत आहे.
खोपोली शहरात स्वच्छतेसाठी नगरपरिषदेने कोट्यवधी रुपयांची ठेकेदारी ठेकेदाराला दिली आहे. लाखों रुपयांचा बॅनरबाजीवर खर्च करण्यात आला. मोठा गाजावाजा करीत नवीन गाड्यांचे उद्घाटन करीत कार्यक्रम घेण्यात आले. मात्र, शहरात कोणतेही ठिकाण पाहिले तर घाणीचे ढिगारे...त्या घाणींवर तोंड मारताना मोकाट जनावरे दिसतात. तुंबलेली गटारे व घाणीच्या साम्राज्यमुळे डासांची संख्या झपाट्याने वाढली असून ताप,थंडी, टायफाईड, डेंग्यू आणि मलेरियासारखे गंभीर आजार डासांच्या चावण्याने होत आहेत. या आजारांवर उपचारासाठी लाखों रुपये रुग्णालयात सर्वसामान्य लोकांना मोजावे लागत आहेत. या आजारामुळे अनेकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. तसेच दिवसेंदिवस भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. रस्त्यावर प्रवास करताना ही भटकी कुत्रे चावा घेण्यासाठी धावून अंगावर गेल्याने अनेक अपघात घडले असून अनेकांना चावा घेण्याच्या घटना देखील घडल्या आहेत. गणेशोत्सव, ईद, दसऱ्यानंतर दिवाळीसारख्या सणासुदीच्या दिवशी देखील नगर परिषदेकडून स्वच्छतेची काळजी घेतली जात नाही. औषध फवारणींवर दुर्लक्ष केले जात आहे. मोकाट जनावरे घाणीच्या ढिगार्यावर प्लास्टिकच्या पिशव्यासह अनेक प्रकारची घाण खाल्ल्याने मोकाट जनावरांचे देखील आरोग्य धोक्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. खोपोली नगर परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना खोपोलीकरांच्या आरोग्याची व खोपोली शहरातील समस्यांशी कोणतेच देणे-घेणे राहिलेले नाही का ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
खोपोली नगर परिषद कार्यालयापासून अंदाजे १०० मीटर अंतरावर वासरंग रोडला लागून नगर परिषदेने लाखों रुपये खर्च करून आलिशान शौचालय बांधले होते. नगर परिषदेच्या डोळ्यादेखत शौचालय भुईसपाट करण्यात आले तरी मुख्याधिकारी पंकज पाटील यांनी शौचालय तोडणाऱ्या माफियांवर कोणतीच कारवाई करण्याची हिंमत दाखवली नसल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे. खोपोली नगर परिषदेच्या दुर्लक्षपणामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. शहरात जागोजागी रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य पसरले आहे. शहरवासीयांना खड्ड्यातून प्रवास करावा लागत आहे. पावसाळ्याआधी डांबरी रस्ते बनविण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, रस्ते दर्जेदार न बनल्याने जनतेचा पैसा हा खड्ड्यात गेल्याचे रस्त्यांचे चित्र पाहिल्यावर दिसून येत आहे.
नगर परिषद कार्यालयाच्या काही अंतरावर मुख्य रस्त्यावर वर्षभरापासून भला मोठा खड्डा पडला असून मुख्यधिकारी साहेब खड्ड्यातून प्रवास करतात मात्र खड्डा बुजविण्यासाठी सांगत नाहीत ? बिल्डरांकडून सांडपाणी थेट रस्त्यावर सोडण्यात येत असताना त्याच्यावर कोणतीच कारवाई करण्याची हिंमत दाखवत नाहीत ? मोठी रोगराई पसरून नागरिकांचा जीव गेल्यावर मुख्यधिकारी या समस्यांवर लक्ष देणार का? शहरात दिवसेंदिवस वाढते अतिक्रमण खोपोली करांची डोकेदुखी बनली आहे. डोंगरभर समस्या असताना या कामचुकार लोकसेवकामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खोपोली शहराला इमानेएतबाराने काम करणारा लोकसेवक का दिला जात नाही ? अशा कामचुकार, काम शून्य अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी करून योग्यशीर कारवाई करण्याची मागणी खोपोलीकरांमधून होत आहे.