कर्जत-खालापूर विधानसभेवर पुन्हा भगवा फडकवू !या!

 


* महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्याचा शिवसैनिकांचा निर्धार 

खालापूर / प्रतिनिधी :- कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांना दुसऱ्यांदा आमदार करण्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसली असून कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघावर पुन्हा भगवा फडवू या, असा निर्धार करण्यात आला. राज्यात लाडकी बहीण योजना सुरु झाल्यानंतर अनेक महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. काही महिलांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही अशा महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपर्क अभियान सुरु करण्यात आले आहे. याच योजनेच्या अनुषंगाने आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ता आढावा बैठक कर्जत-खालापूर विधानसभा मतदार संघांचे आ. महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वाखाली खालापूर महड फाटा येथील युके रिसॉर्ट येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

महायुतीचे सरकार हे गोरगरीब जनतेचे सरकार आहे. आजपर्यंत महिलांसाठी कोणत्याही सरकारने अशा योजना राबविलेल्या नाहीत, त्यामुळे विरोधकांना त्याचा त्रास होऊ लागला आहे. महिलांचा वाढता पाठिंबा पाहून द्वेषापोटी काँग्रेसच्या नेत्यांनी ही योजना निवडणुकीनंतर बंद होईल असे म्हटले होते. मात्र, ही योजना कधीच बंद होणार नाही तर महायुतीचे सरकार पुन्हा आले तर अशा अनेक योजना भविष्यात येतील असे आश्वासन दिले. आचारसंहिता लागली असून निवडणूकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याने आजपासूनच कामाला लागायला पाहिजे. जनसंपर्क वाढवित प्रत्येक नागरिकाला सरकारच्या माध्यमातून आपल्या मतदार संघात झालेल्या विकासाची माहिती द्या. गावबैठका सुरु करा. पुढील काळात राष्ट्रवादीची सगळीच मंडळी आपल्यासोबत येणार आहे. कारण महायुतीकडून आ. महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून या मतदार संघात चांगले काम झालेले आहे. त्यामुळे जनतेच्या मनात विश्वास निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य नागरिक सुद्धा हेच बोलू लागला आहे आणि हिच आपल्या कामाची पोचपावती असून कार्यकर्त्यांनी सक्षमपणे या निवडणूकीला सामोरे जायचे आहे. आपण आपले काम प्रामाणिकपणे करायचे आहे, विजय हा आपलाच आहे,  असे विश्वास आ. महेंद्र थोरवे यांनी व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी आणि शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केला. तसेच अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. 

यावेळी जिल्हा प्रमुख संतोष भोईर, संपर्क प्रमुख विजय पाटील, हनुमंत पिंगळे, निवृत्ती पिंगळे, तालुका प्रमुख संदेश पाटील, युवासेना तालुका अधिकारी रोहित विचारे, हाळ खुर्द ग्राम पंचायतीचे उपसरपंच आजिम मांडलेकर, विश्वनाथ पाटील, एच. आर. पाटील, माजी सभापती विश्वनाथ पाटील, जेष्ठ नगरसेवक मोहन औसरमल, राजू गायकवाड, माजी पंचायत समिती सदस्य अक्षय पिंगळे, जितू सकपाळ, आत्करगावचे उपसरपंच गणेश पाटील, संजय देशमुख, महिला तालुका प्रमुख रेश्मा आंग्रे, खोपोली शहर प्रमुख प्रिया जाधव, शितल ढोकळे, कांचन जाधव, निलम चोरघे, खालापूर नगराध्यक्षा रोशना मोडवे, माधवी रिठे यांसह मोठ्या संखेने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

* प्रत्येक संकटात साथ देणारा आमदार आपल्या पाठीशी - तालुकाप्रमुख संदेश पाटील

आ. महेंद्र थोरवे यांना पुन्हा निवडून आणण्यासाठी आपण सर्व कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. अनेक निवडणुकीत आ. थोरवे यांनी सर्वांनाच चांगले सहकार्य केले आहे. आज आ. महेंद्र थोरवे यांना हरविण्यासाठी जर अनेकजण एकत्र येत असतील तर आपल्या आमदार साहेबांमध्ये काहीतरी आहे हे समजायला पाहिजे. आमदार साहेब येणाऱ्या निवडणुकीत 100 टक्के निवडून येणार आहेत. मात्र, कार्यकर्त्यांनी थोडेस संयम ठेवावे. पुढील काळात आपल्याला अनेक अमिषाला सामोरे जायचे आहे. मात्र, या अमिषाला बळी न पडता आमदार साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा. यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते मात्र, आपल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मागे आ  महेंद्र थोरवे उभे आहेत. प्रत्येक संकटात कार्यकर्त्याच्या पाठीशी उभा राहणारा आमदार म्हणजे महेंद्र थोरवे हे आहेत. प्रत्येक वेळी पाठीशी उभे राहणाऱ्या आपल्या आमदार साहेबांच्या पाठीशी आता आपण उभे राहिले पाहिजे, असे आवाहन तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी केले. 

Post a Comment

Previous Post Next Post