* उत्खनन व भराव याची माहिती पत्रकारांनीच द्यायची का?
* 8 ऑक्टोबरपासून पत्रकार राजेंद्र जाधव ठिय्या आंदोलन करणार
खालापूर / प्रतिनिधी :- मागील काही महिन्यांपासून कर्जत-खालापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व भराव करण्यात आले आहेत. मात्र, या उत्खनन व भरावाची रॉयल्टी नियमानुसार भरली नसल्याचे दिसून येत आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
दरम्यान, प्रातांधिकारी प्रकाश संकपाळ यांनी सांगितले की, देण्यात आलेले निवेदन मोघम स्वरूपात आहे. याबाबत बोलतांना पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव म्हणाले की, प्रातांधिकारी साहेब आपल्या अखत्यारीतील तलाठी यांचा आढावा घेवू शकतात. 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2024 पर्यंत झालेल्या उत्खनन व भरावाची सविस्तर माहिती तलाठी, मंडल अधिकारी व नायब तहसिलदार यांच्याकडे असणार पण त्यांच्याकडून आढावा घेण्याऐवजी प्रांताधिकारी साहेब आपली जबाबदारी झटकत पत्रकार व तक्रारदार यांनाच उत्खनन व भरावाची सविस्तर माहिती द्यावी, असे सांगत आहेत.
कर्जत प्रातांधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, कर्जत-खालापुर तालुक्यामध्ये मागील वर्षभरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन व भराव करण्यात आले परंतु हे उत्खनन व भराव करताना शासनाची रॉयल्टी मात्र नियमानुसार भरण्यात आलेली नाही. अनेक ठिकाणी हजारो ब्रास उत्खनन करण्यात आले तर नाममात्र रॉयल्टी भरण्यात आली आहे. तसेच अनेक ठिकाणी झालेल्या उत्खनन व भराव यांची माहिती तहसील प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे, तरी 1 जानेवारी 2023 ते 30 जून 2024 या कालावधीत कर्जत-खालापूर तालुक्यात झालेल्या उत्खनन व भरावाची सविस्तर चौकशी करून दोषी तलाठी, मंडल अधिकारी, निवासी नायब तहसिलदार, तहसिलदार यांच्यावर कार्रवाई करण्यात यावी. निवेदन दिल्यापासून 15 दिवसांत कर्जत-खालापूर तालुक्यातील उत्खनन व भराव यांची चौकशी न झाल्यास 8 ऑक्टोबर 2024 पासून कर्जत प्रातांधिकारी कार्यालयाबाहेर आपण बेमुदत लाक्षणिक उपोषण करू, असा इशारा पत्रकार राजेंद्र शिवाजी जाधव यांनी दिला आहे.