आतिशी सिंग यांनी घेतली दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

 


* महाराष्ट्रात सुद्धा सर्व निवडणूका लढण्याची तयारी

नवी दिल्ली / प्रतिनिधी :- आदमी पक्षाच्या नेत्या आतिशी सिंग यांनी शनिवारी दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दिल्लीचे उपराज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच आतिशी यांनी नवा रेकॉर्ड केला आहे. ४३ वर्षांच्या आतिशी दिल्लीच्या इतिहासातील सर्वात तरुण मुख्यमंत्री आहेत. त्या दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री आहेत. शपथविधी कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह आम आदमी पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित होते.

आतिशींसोबत पाच मंत्र्यांनीही यावेळी शपथ घेतली. सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. नव्या सरकारमध्ये मुकेश अहलावत हा एकमेव नवा चेहरा आहे. मुकेश अहलावत २०२० साली पहिल्यांदा आमदार झाले आहेत. ते सुल्तानपूर माजराचे आमदार आहेत. अहलावत उत्तर पश्चिम दिल्लीमधील पक्षाचा दलित चेहरा आहे. सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, गोपाल राय, इमरान हुसैन हे सर्वजण यापूर्वी अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते.

अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीचे सुत्रे हाती घेतली आहेत. महाराष्ट्रात सुद्धा आम आदमी पार्टी पूर्ण ताकदीने येणाऱ्या विधानसभेच्या आणि महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुका लढणार आहे व पक्षाला बळकट करणार आहे असे आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य संघटन सचिव डॉं. रियाज पठाण यांनी सांगितले. दिल्लीला तिसऱ्यांदा महिला मुख्यमंत्री मिळाला आहे, परंतु महाराष्ट्राची स्थापना झाल्यापासून एकदाही महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री लाभलेल्या नाहीत, असेही डॉं. पठाण यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post