* दोन गंभीर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू
कर्जत / प्रतिनिधी :- कर्जत कल्याण राज्य मार्गांवरील नेरळ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर एका कारचालकाने नेरळ विद्यामंदिर शाळेतील तीन शाळकरी मुलांना कारने उडविल्याची घटना घडली आहे. या अपघातात दोन शाळकरी मुलांना गंभीर दुखापत झाली असून, मयूर मोहन पारधी या शाळकरी मुलाचा रुग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर कारचालक लोचन धुरी याला नेरळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नेरळ - माथेरान घाट रस्त्यावरील जुमापट्टी जवळील धस वाडीतील राहणारे मयूर मोहन पारधी, भगवान सखाराम पारधी व विशाल आलो दरोडा हे नेरळ विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेत असून नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास शनिवार दि. २१ सप्टेंबर रोजी साडे सात वाजण्याच्या सुमारास नेरळ विद्या मंदिर शाळेत कर्जत - कल्याण राज्यमार्गांवरून पायी जात असताना अंबरनाथ येथील राहणारे लोचन धुरी हे त्यांची पत्नी व नऊ वर्षाचा पुतण्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथून अंबरनाथ येथे त्यांची ईरटीका कार क्र. एम एच ०५ सी वी २८३४ ने जाताना नेरळ पोलिस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पटेल मार्ट येथे मयूर मोहन पारधी (वय वर्ष १५, १० महिने इयत्ता ११ वी), विशाल आलो दरोडा (वय वर्ष १७, ०३ महिने इयत्ता १२ वी), भगवान सखाराम पारधी (वय वर्ष १७, ०५ महिने इयत्ता १२वी) यांना धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातातील शाळकरी मुलांना उपचाराठी प्रथम नेरळ येथील डॉं. शेवाळे यांच्याकडे नेले असता, त्यांना पुढील उपचाराकरीता बदलापूर येथील धन्वंतरी रुगणालयात नेण्यात आले आहे. तर मयुर मोहन पारधी याला डोंबिवली येथील एम. एस. रुग्णालयात दाखल केले असता, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तर नेरळ पोलिसांनी ईरटीका कारसह गाडी चालक लोचन धुरी याला ताब्यात घेतले असून, नेरळ पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर सदर झालेला अपघात मयुर मोहन पारधी यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातामधील जखमी विशाल आलो दरोडा, भगवान सखाराम पारधी, व मयत मयूर मोहन पारधी हे आदिवासी समजातील असुन या घटनेमुळे आदिवासी समजावर मोठया प्रमाणात दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर चालक लोचन धुरी यांनी सुरुवातीपासून या अपघातात सामजस्याची भूमिका घेत आपली चुकी असल्याचे कबूल केल्याचे व लोचन यांची पत्नी जखमी तरुणांना रुग्णालयात उपचारासाठी स्वतःहून सोबत गेल्याची व माहिती समोर येत आहे.
कर्जत कल्याण राज्य मार्ग पुन्हा एकदा या अपघातानंतर चर्चेचा विषय ठरतो. ठिकठिकाणी राज्यमार्गांचे रखडलेले अर्धवट काम आज या अपघाताला कारणीभूत असल्याचे व या घटनेत सार्वजनिक बांधकाम विभागाला देखील तेवढेच दोषी धरले पाहिजे. ज्या ठिकाणी एक पदरी रस्ता आहे, तेथील रस्ता दुहेरी करण्याची मागणी होत असताना, आजपर्यंत अनेकांचे अशा ब्लॅक स्पॉट ठिकाणी अपघात होवून मृत्यू झालेल्या घटनेकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने गांभीर्य लक्षात घेता उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल.
- अंकुश दामणे
शिवसेना शिंदे गटाचे तालुका सचिव
कर्जत - कल्याण राज्य मार्गांवर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या व ठेकेदाराच्या मनमानी कामामुळे असे अनेक अपघात होऊन अनेकांचे जीव गेले असुन, तर अरूंद रस्त्यामुळे आज आमच्या आदिवासी समाजातील धसवाडीतील तीन शाळकरी मुलांचा कारच्या धडकेत अपघात झाला असुन, या अपघाताला व या अपघातातील दोन अति जखमी व एक मृत्यू पावलेल्या शाळकरी मुलांच्या घटनेला संपूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभाग व ठेकेदार हेच जबाबदार असुन, लवकरात लवकर ज्या ठिकाणी अरूंद मार्ग आहेत. त्या ठिकाणचे रस्ते रूंद करण्याचे काम झाले नाही. तर आदिवासी समाज हा सार्वजनिक बांधकाम विभाग पनवेल कार्यालयावर येऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल.
- जैतू पारधी
कर्जत तालुका आदिवासी जनजागृती विकास संघटना अध्यक्ष.
