गडकरी स्वतः बोलले...नऊशे सत्तावीस कोटींचा लातूर-मुरुड-टेंभुर्णी महामार्गाचे काम रखडले!

 

* अपघातात आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू!

* राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमरण उपोषण

वर्धा / रुपेश संत :- मागील पंचवीस वर्षांपासून ५२ किलोमीटरचा लातूर-मुरुड-टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदीकरणाचे काम रखडले आहे. मागच्या दोन वर्षांपासून या महामार्गासाठी जनतेने आंदोलन उभे केले आहे. आतापर्यंत या महामार्गांवर अपघातात १२३ जणांचा मृत्यू झाला असून हजारों अपघाताच्या घटना घडल्या आहेत. आता अक्षरश: जगणे कठीण झाले आहे, एवढा जनतेला त्रास होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अद्याप या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. उलट लोकसभेच्या निवडणुकीसाठी लातूरला आले असताना गडकरी स्वत: म्हणाले की, 'मला या रस्त्याबद्दल बोलायला ही लाज वाटते.'

आज प्रेस क्लब येथे लातूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांनीवरील विधान केले. याप्रसंगी बोलताना शेटे म्हणाले की, या महामार्गावर १२३ मृत्यू होणे म्हणजे १२३ कुटूंब कायमचे उद्धवस्त होणे होय. मी स्वत: दोन वेळा या महामार्गाची मागणी करणा-या शिष्टमंडळाला, पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला घेऊन गेलो, त्यांनी दोन वेळा गडकरी यांना फोनद्वारे कळवले की या रस्त्याचे काम करुन द्या. यानंतर गडकरी तीन वेळा लातूरला आले आणि भर सभेत लातूरवासियांना सांगितले, की या रस्त्याचे काम करणे गरजेचे आहे आणि ते मी करुन देतो मात्र, कोणतेही आश्‍वासन त्यांनी पाळले नाही, अशी टिका शेटे यांनी केली.

एवढ्या लोकांचा मृत्यू झाल्यावर देखील गडकरी या महामार्गाचे काम करत नसल्यामुळे आम्ही नागपूरात त्यांच्या दारात, कार्यालयासमोर उपोषणाला उद्यापासून बसणार होतो मात्र, पोलिसांनी परवानगी न दिल्याने आम्ही संविधान चौकात नाईलाजाने व नाउमेद होऊन, शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाला बसणार असल्याचे शेटे यांनी सांगितले. राजकारणात आम्हाला पक्षाकडून पदे मिळतात ती जनतेची काम करण्यासाठी, असे ते म्हणाले.

या उपोषणाच्या माध्यमातून आम्हाला गडकरी यांना सांगायचे आहे की, या महामार्गाचा डीपीआर दिल्लीमध्ये तयार आहे. ५२ किलोमीटरपर्यंत ३० मीटरची जागा ताब्यात आहे. नऊशे सत्तावीस कोटी देखील त्यासाठी मिळाले आहेत. चौपदीकरणाला २० मीटरची जागा हवी असते, अश्‍या वेळी  ३० मीटर ताब्यात असताना हा महामार्ग गडकरी यांच्या मंत्रालयाने का रोखून धरला आहे? असा सवाल त्यांनी केला. त्या डीपीआरला गडकरी यांनी प्रशासकीय मान्यता द्यावी, मान्यतेचे ते पत्र जोपर्यंत आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमरण उपोषणाला बसणार, असा इशारा शेटे यांनी दिला.

जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत तवले यांनी सांगितले की, गडकरी यांनी तर तीन-तीन वेळा लातूरमध्ये येऊन या रस्त्याचे आश्‍वासन दिले. २०२४ च्या मे महिन्यातील सभेत तर त्यांनी ‘‘मला या रस्त्याबद्दल बोलायलाही लाज वाटते’ असे म्हटले. याचा अर्थ प्रशासनसुद्धा गडकरींचे ऐकत नाही, असे आहे का? टक्केवारीसाठी काम अडले असेल तर, काम झाल्यावर टक्केवारी ज्याला कोणाला द्यायची आहे ती द्या पण काम तर करा, असे आवाहन तवले यांनी केले. ९२७ कोटींचा प्रकल्प असून ५२ किलोमीटरचा हा प्रकल्प असल्याचे तवले यांनी सांगितले. गडकरी तर हजारो कोटींचा प्रकल्प देशभर करीत असतात मग, लातूर-मुरुड-टेंभुर्णीशी गडकरींना काय वैर आहे? असा सवाल त्यांनी केला.

अलीकडे महाराष्ट्रातील ब-्याच महामार्गांचा वाद न्यायालयात गेला असून, जे काम प्रशासन व मंत्र्यांनी करायला हवे ते काम न्यायालयाला करावे लागत आहे. तुमची मागणी उपोषण केल्यावरही मान्य झाली नाही तर न्यायालयात दाद मागणार का? असा प्रश्‍न केला असता, प्रत्येक गोष्ट न्यायालयालाच करायची असेल तर सरकार कशासाठी बसले आहे? असा सवाल त्यांनी केला. मंत्री कशासाठी आहेत, न्यायालयालाच करु द्या सगळे निर्णय, मग आम्ही पण न्यायालयातच जाऊ, असे उत्तर तवले यांनी दिले.

याप्रसंगी बोलताना, नागपूर शहराध्यक्ष दुनेश्‍वर पेठे म्हणाले, की गेल्या अनेक वर्षांपासून या महामार्गाची मागणी लातूरकर करीत आहेत. गडकरी यांच्याकडे सातत्याने यांनी तगादा लावला मात्र, अनेक वेळा आश्‍वासन देऊनसुद्धा गडकरी यांनी आश्‍वासनाची पूर्तता केली नाही. परिणामी, आज लातूरकरांना लातूरवरुन ६०० किलोमीटरवरुन येऊन गडकरी यांच्या मतदारसंघात आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली आहे. गडकरी यांची प्रतिमा अशी आहे की मागाल त्यांना हजारो कोटींचे रस्ते दिले, मग १२३ अपघाती मृत्यूनंतर देखील लातूरकरांची मागणी कधी पूर्ण करणार? नागपूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे आमची संपूर्ण शहर कार्यकारिणी या उपोषणाला संपूर्ण सहकार्य करणार असून उपोषणस्थळी सोबत असणार आहे, असे पेठे यांनी सांगितले. या प्रसंगी ॲड. नारायण नागरगोजे, सचिन सुर्यवंशी, नरेंद्र तवले, दिपक गवळी, दिग्विजय शेटे, शार्दुल उबाळे, अक्षय चव्हाण, कृष्णा भालेकर, अंजली पाटील, विजू ताई, लिनाताई पाटील हे उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post