तोंडाला काळीफिती बांधून खोपोली मुस्लिम समाजातर्फे निषेध

 


* रामगिरी महाराज यांना अटक

* करा पोलिसांना दिले निवेदन

खोपोली / प्रतिनिधी :- समाजात गैरसमज पसरवून प्रेषित मोहम्मद पैगंबर साहेब यांच्याबाबत अपशब्द वापरून धार्मिक भावना दुखावून सामाजिक तेढ निर्माण करून शांतता भंग करीत असलेल्या रामगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याकरीता खोपोली येथील सर्व मुस्लिम समाजाच्या वतीने खोपोली पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदन देण्याकरिता मुस्लिम समाजाचे शेकडो नागरिक पोलीस स्टेशन येथे जमा झाले होते तसेच सर्व नागरिकांनी तोंडावर काळ्या फिती बांधून शांततेने निषेध व्यक्त केला.

कोणताही धर्म इतर धर्माबाबत टीका करण्याचे शिक्षण देत नाही तसेच मुस्लिम समाज प्रत्येक धर्माचा आदर करतो आणि पूर्वीपासून करीत आलेला आहे. परंतु सध्या धर्माचे राजकारण सुरू आहे, धार्मिक भावना भडकावून जातीय दंगली होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे समाजात जातीय दंगली होऊ नये व शांतता व सलोख्याचे वातावरण रहावे व भारतीय संस्कृतीची विविधतेतून एकतेची प्रतीक आहे. त्या संस्कृतीचे रक्षण व्हावे व समाजात दंगली होऊन सामाजिक नुकसान होऊ नये याकरिता रामगिरी महाराज विरुद्ध धार्मिक भावना दुखावण्याचा उद्देशाने शब्द उच्चारण, धार्मिक भावना भडकावणे, धर्मावरून गटांमधील वैर वाढवणे, शांतता भंग करण्याच्या हेतूने अपमान करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे याकरिता भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई होणे जरुरीचे आणि आवश्यक आहे. त्याकरिता मुस्लिम समाज एकत्र येऊन सदर तक्रार अर्ज देत आहे असे मुस्लिम समाजातर्फे सांगण्यात आले.

मुस्लिम समाज संविधानाचा आदर करतो व डॉं. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला दिलेल्या संविधानाच्या मर्यादेंतर्गतच आम्ही रामगिरी महाराज यांना अटक करावी अशी मागणी करत आहोत असे मुस्लिम समाजातर्फे सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post