कर्जत / नरेश जाधव :- आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर आयोजित दहीहंडी उत्सव दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 4 वाजता रॉयल गार्डन शेजारील मैदानात आयोजित करण्यात आला होता.
आ. महेंद्र थोरवे यांनी या दहीहंडी उत्सवाला उपस्थित राहून दहीहंडी उत्सवानिमित्त आलेल्या गोविंदाशी संवाद साधला. आ. थोरवे म्हणाले की, दहीहंडी उत्सव हा एकात्मतेचे प्रतीक आहे हा उत्सव संपूर्ण देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्रात शिवसेना प्रणित शिंदे सरकार अस्तित्वात आल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी गोविंदा पथकांसाठी विमा घोषित केला व प्रत्येक गोविंदाची काळजी घेण्याचे वचन दिले, त्यामुळे हा दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जात आहे. आ. थोरवे म्हणाले की, मी सर्व गोविंदा पथकांचे त्यानिमित्ताने अभिनंदन करीत आहे. आपण हा जल्लोषपूर्ण थरार या ठिकाणी अनुभवत आहात व दहीहंडीला सलामी देत आहात. तसेच कर्जतकरांनी या दहीहंडी महोत्सवाला जी साथ दिली त्याबद्दल समस्त कर्जतकरांचे देखील अभिनंदन व आभार मानतो.
गोविंदा पथकांचे व उपस्थित कर्जतकरांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रसिद्ध गायक राजा आदईकर, १००१ मथुर बैलाचे मालक राहुल पाटील, सिने अभिनेत्री क्रांती रेडेकर, युट्युबर विनायक माळी, रील स्टार अक्षदा पाटील, अपूर्वा पाटील यांनी उपस्थिती लावली होती.
या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने 31 मंडळांनी आपली सलामी पूर्ण केली. यामध्ये महिला गोविंदा पथकाचा देखील सहभाग होता. या दहीहंडी उत्सवातील खुल्या गटामध्ये प्रथम क्रमांकाचे पारितोषिक व मानाची दहीहंडी साई एकविरा गोविंदा पथक वडाळा यांनी फोडली. कर्जत तालुका मर्यादित मानाची दहीहंडी सलग दुसऱ्या वर्षी फोडण्याचा मान विठ्ठल रखुमाई आनंदवाडी नेरळ या गोविंदा पथकाने पटकावला.
याप्रसंगी पुरुष व महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचे देखील आयोजन करण्यात आले होते. उपस्थितांमध्ये ड्रॉ घेऊन सर्वांना बक्षीसाचे वाटप देखील करण्यात आले. या सोहळ्यासाठी रायगड शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना कार्यकर्ते व असंख्य कर्जतकर उपस्थित होते.