के. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कूल कर्जत शाळेतील विद्यार्थ्यांनी घडविले मराठमोळ्या संस्कृतीचे दर्शन

कर्जत / प्रतिनिधी :- बुधवार, दि. १७ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशीचे औचित्य साधून कर्जत येथील के. ई. एस. इंग्लिश मिडीयम शाळेतील इयत्ता ७ वी, ८ वी व ९ वीच्या विद्यार्थ्यांनी संत परंपरेचे प्रात्यक्षिक दर्शवत ढोल ताश्याच्या गजरात विठोबाच्या नामस्मरणात पायी दिंडी काढली. या दिंडीत शाळेतील इयत्ता ७ वी ते ९ वीचे  ३०० विद्यार्थी तसेच, संस्थेचे संस्थापक, शाळेच्या मुख्याध्यापिका, शाळेचे शिक्षक - शिक्षकेत्तर कर्मचारी असे एकूण ३७० लोक सहभागी झाले होते. 

शाळेत विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीचे पूजन मान्यवरांच्या हस्ते पार पडल्यानंतर आमराई रोड कर्जत येथून या दिंडीला सुरुवात झाली. पुढे आंबेडकर चौक-राऊत चौक-कन्या शाळा- अभिनव शाळा असे मार्गक्रमण करीत श्रीराम पुलावरील प्रति पंढरपूर येथील विठूरायासमोर पोहचली.  या प्रती पंढरपूर येथे शाळेतील विद्यार्थ्यांनी पथनाट्य, विठ्ठलाचा गजर, विठ्ठलाचे अभंग अशा अनेकविध गाण्यांवर वेगवेगळे कार्यक्रम सादर केले . 

"अवघी अवतरली पंढरी" या उक्तीचा साक्षात्कार येथे झाला. या दिंडीत सहभागी विद्यार्थ्यांनी जे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले ते पाहून जणू पंढरपूरच कर्जतमध्ये अवतरले आहे असे वाटले. या कार्यक्रमास संस्थेचे  चेअरमन डॉं. अनिरुद्ध जोशी, सेक्रेटरी प्रवीण गांगल, सदस्य मनोरे सर, खजिनदार परमार सर, सदस्य पिंपरे सर, राजेश भुतकर सर तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनुपमा चौधरी, माध्यमिक विभागाचे विभाग प्रमुख सुनील बोरसे,प्राथमिक विभागाच्या विभाग प्रमुख श्रीमती संपदा भोगले यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. अशा प्रकारे अतिशय आनंदात, उत्साहात, विठुरायाच्या गजरात व नामस्मरणात हा दिंडी सोहळा  पार पडला.

Post a Comment

Previous Post Next Post