* पत्रकार नरेश जाधव व टीम आमरण उपोषण करणार
* तहसिलदार, एमएसआरडीसी यांच्याकडून उत्तर नाही
कर्जत / विशेष प्रतिनिधी :- कर्जत तालुक्यातील कर्जत ते मुरबाड (NH 48) म्हणजेच एमएसआरडीसी (MSRDC) आणि सार्वजनिक बांधकाम (PWD) विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या रस्त्यालगत साईडपट्टी खोदून वायफाय केबल टाकण्याचे काम जोरदार सुरू आहे. हे केबल रस्त्याची साईटपट्टी खोदून व नदीच्या भागातून टाकण्यात येत आहेत. त्यामध्ये एमएसआरडीसी (MSRDC), सार्वजनिक बांधकाम (PWD) विभाग, पाटबंधारे विभाग आणि फॉरेस्टच्या जागेतून रस्त्याच्या साईड पट्ट्यात खोदून टाकण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, केबल टाकण्याकरीता ठेकेदाराकडून कर्जत तालुक्यातील संबंधित चार विभागांची खोदकाम करण्यासाठी परवानगी म्हणजेच नाहरकत दाखल घेतला नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. याबाबत तिन्ही विभागातून माहिती घेतली असता त्यांनी आमच्या कार्यालयातून कसलीही परवानगी घेतली नसून याबाबत आम्ही सुरू असलेल्या कामाची पाहणी करून योग्य ती चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करू असे सांगण्यात आले होते. परंतु पत्रकार नरेश जाधव यांच्याकडून निवेदनाद्वारे चौकशीची मागणी केली होती, परंतु या प्रकरणी तहसिलदार, एमएसआरडीसी व संबंधित विभागाकडून तक्राराला कोणतेच उत्तर देण्यात आलेले नसल्याने अखेर पत्रकार नरेश जाधव व टीम आमरण उपोषण करणार असल्याचे समजते.
उपोषणाबाबत लवकरच निवेदन देण्यात येणार आहे, पत्रकार नरेश जाधव यांनी सांगितले. यापूर्वी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, खोदकाम करणाऱ्यांकडे एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत, पाटबंधारे विभाग कर्जत, फॉरेस्ट डिपार्टमेंट यापैकी एकाकडूनही ना हरकत किंवा परवानगी आढळून आलेली नाही. तरी अशा बेकायदेशीर काम करणाऱ्या कंपन्या आणि ठेकेदार यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच पावसाला सुरूवात झाली असून पावसात रस्त्याच्या कडेची साईटपट्टी खोदल्याने साईटपट्टी खचून एखादा वाहनाचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशीच एक घटना नुकतीच कशेळे रस्त्यांवर एक वाहन फसले होते. या खड्ड्यामध्ये पाणी साचल्यानंतर अपघात होऊ शकतो, यामुळे मनुष्यहानी होऊ शकते. केबल टाकण्यासाठी साईटपट्टी खोदून अपघात झाल्यास अथवा जीवितहानी झाल्यास संबंधित विभागाचे अधिकारी व साईटपट्टी खोदून केबल टाकणाऱ्या ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावे तसेच ठेकेदार यांना देण्यात आलेल्या नियम, अटी, शर्तीचे पालन केले नसल्यास हे काम त्वरित बंद करून कारवाई करण्यात यावी.
याबाबत पत्रकार नरेश जाधव यांनी महामार्ग व तालुक्यातील रस्त्यांवर बेकायदा सुरू असलेल्या कामाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्याबाबत दि. १८ जून ते २० जून रोजी एमएसआरडीसी विभागाला ईमेलवर तर संबंधित अधिकारी इंजिनिअर संदीप पाटील यांच्या व्हाट्सअपवर तसेच काही कार्यालयात स्वतः जावून पत्र दिले असून त्याची पोच देखील घेण्यात आली आहे. पण अद्यापपर्यंत त्या देण्यात आलेल्या पत्राचे उत्तर अपेक्षित असतांना कोणतीच कार्यवाही सह पत्राचे साधे उत्तर देण्यात आले नाही. तर हे तक्रारी पत्र तहसील कार्यालय कर्जत, एमएसआरडीसी विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्जत, वनविभाग कर्जत पूर्व, पाटबंधारे विभाग कर्जत यांना देखील देण्यात आले असून यावर कुठल्याही प्रकारचे उत्तर या सर्व कार्यालयातून देण्यात आलेले नाही. सर्व कार्यालयात पत्र व्यवहार करून देखील पत्राची दखल घेतली नाही मग हे आधिकारी नक्क्की काय कामे आणि कुणासाठी कामे करतात याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, असा प्रश्न पत्रकार जाधव यांनी उपस्थित केला आहे. या सर्व अधिकारी यांची योग्य ती चौकशी होऊन दोषी आढळल्यास यांच्यावर निलंबनाची कारवाही करावी, अशी मागणी पत्रकार संघटनेच्या वतीने जोर धरू लागली आहे.


