रायगड / प्रतिनिधी :- उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करीत असल्याने रुग्णांना दिलासा मिळणार असून रुग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. आरोग्य सेवा अधिकाधिक सक्षम होत आहेत, असे प्रतिपादन यावेळी आदिती तटकरे यांनी केले.
माणगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटरचे उद्घाटन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, उपसंचालक डॉं. अशोक नांदापूरकर, जिल्हा चिकित्सक डॉं. अंबादास देवमाने, उपजिल्हा रुग्णालय डॉक्टर, कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी तटकरे पुढे म्हणाल्या की, डायलिसिस सेवा आणि सिटीस्कॅन सेंटर या सेवांमुळे रुग्णांच्या पैशांची बचत होणार आहे. कोरोना काळात उपजिल्हा रुग्णालयात अनेक अत्याधुनिक सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. लवकरच माणगांव येथे ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहे.
यावेळी राजीव साबळे, प्रमोद घोसाळकर,माजी नगराध्यक्ष आनंद यादव, नीलिमा घोसाळकर, विपुल उभारे, क्रिश्ना डायग्नोस्टीक्स कार्यकारी संचालक पल्लवी जैन, वैद्यकीय अधीक्षक अरुणा पोहरे, शादाब गैबी, संजय अण्णा साबळे, सुमित काळे, सुनील पवार आदी उपस्थित होते.
माणगांव हे जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे, त्यामुळे अशा इतर आरोग्य सेवा यापूर्वी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व क्रिश्ना डायग्नोस्टिक यांच्या संयुक्त विद्यमाने सार्वजनिक खाजगी भागीदारी तत्त्वावर उपजिल्हा रुग्णालय माणगांव येथे डायलिसिस व सिटी स्कॅन सेंटर सुरू झाले आहे. ही सेवा सुरू होत असल्याने रुग्ण व नागरीकांना लाभ होईल.
