कर्जत / जयेश जाधव :- तालुक्यातील पळसदरी येथील श्री स्वामी समर्थ मठात गुरुपौर्णिमा अर्थात व्यास पौर्णिमा हर्षोल्हासात साजरी करण्यात आली. गुरु पौर्णिमेनिमित्त सकाळपासून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी स्वामींच्या सगुण पादुकांवर अभिषेक, गुरूपाद्य पुजन, दत्त याग, तसेच दुपारी आरती, गुरुपौर्णिमा अन्नदान ग्रुपच्या वतीने महाप्रसाद व स्वरांजली हा दृष्टीबाधीतांचा भावभक्ती गीतांचा कार्यक्रम, सायंकाळी श्रीराम समर्थ महिला मंडळाची हरिपाठ सेवा तसेच रात्रीच्या आरतीनंतर तेजस बुवा महाडीक संचालित 'सप्तसूर एक स्वरांगिनी' ही भजनसेवा, महाप्रसाद आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
दुपारच्या सत्रात 'स्वरांजली' या कार्यक्रमादरम्यान पळसदरी पंचक्रोशीतील पहिली चार्टर्ड अकाउंटंट होण्याचा मान मिळविलेल्या सिद्धी संजय शिंदे, पत्रकार अभिजीत दरेकर, प्रभाकर गंगावणे, प्रशांत खराडे यांचा विक्रांत दरेकर, राजू पोतदार, अॅड. प्रदीप सुर्वे, ज्ञाने़श्वर दुधे, रघुनाथ निगुडकर आदींच्या हस्ते शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. २००४ सालापासून गुरुपौर्णिमा अन्नदान मित्र परिवाराच्या वतीने प्रतिवर्षी येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते. यावेळी हजारों भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
याप्रसंगी या कार्यक्रमात विक्रांत दरेकर, राजू पोतदार, अॅंड. प्रदिप सुर्वे, अॅड. राजेंद्र निगुडकर, दिनेश अडावदकर, ज्ञानेश्वर दुधे, रघुनाथ निगुडकर, दत्तात्रेय दरेकर, महेंद्र निगुडकर, सदानंद लोखंडे, महेंद्र शिंदे, वसंत पालांडे, भानुकाका शिंदे, दिलीप पांडे, अजयसिंग गुरूम, देवेंद्र तांबे, वसंत महाडीक, कैलास देशमुख, कृष्णकांत दरेकर, वत्सला वांजळे, माधवी दरेकर, अशोक शितोळे, संजय मालगुंडकर, तानाजी ठोंबरे, मंगेश शिंदे तसेच मोठ्या संख्येने स्वामी भक्त व उपस्थित होते.