* जुन्या आठवणींना मिळाला उजाळा
खालापूर (जि. रायगड) / दिनेश पाटील :- पाताळगंगा विद्यालय होनाड शाळेतील विद्यार्थ्यांची दहावीची बॅच सत्तावीस वर्षानंतर पुन्हा एकदा एकत्र आल्याने विद्यार्थ्यांच्या आंनदाला पारावार उरला नव्हता तर मोठ्या उत्साहात त्यांनी आपल गेट टुगेदर पार पडला.
खालापूर तालुक्यातील होनाड परिसरात कित्येक वर्ष पातळगंगा विद्यालय होनाड ही शाळा कार्यरत आहे. अनेक यशस्वी विद्यार्थी या शाळेतुन घडले आहेत. यापैकी 1997 बॅच मात्र आठवणीत राहिली. त्या बॅचच्या दहावीच्या निकालानंतर शाळेला अनुदान मिळण्यास सुरुवात झाली होती. तीच बॅच पुन्हा एकदा तब्बल सत्तावीस वर्षांनी एकत्र आली होती.
पेण तालुक्यातील वाकृळ गावाशेजारील फार्महाऊसवर गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळपासून सर्व वर्गमित्र एकत्र यायला लागले होते. सर्वांना भेटण्याची इतकी उत्सुकता लागली होती की पुणे, ठाणे, कल्याण अश्या दूरच्या ठिकाणावरून वर्गमित्र आले होते. सुरूवातीला सर्व एकत्र आल्यानंतर खूप भावुक झाले होते. इतक्या वर्षानंतर एकत्र आल्याने प्रत्येकाने एकामेकांची विचारपूस करण्यास सुरुवात केल्यानंतर गंमती जंमती सुरु झाल्या आणि पुन्हा एकदा शाळेतील वातावरण निर्माण झाले होते. सकाळी चहा, नास्टा झाल्यानंतर सर्वजण गप्पागोष्टी करू लागले. अनेकांनी गीत गायले तर अनेकांनी आयुष्यातील अनुभव सांगितले. त्यानंतर दुपारी सर्वांनी एकत्र येऊन भोजन केले आणि पुन्हा एकदा सर्वजण गप्पा गोष्टीत रंगून गेले. या विद्यार्थ्यांमधील एक असलेला दिनेश सुर्वे याचा कोरोना काळात निधन झाले होते, त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. दिवसभर मोठ्या उत्साही वातावरणात हा गेट टुगेदर पार पडत असताना दरवर्षी आपण एकत्र भेटायचे असे सर्वानुमते ठरले.