* रस्ता १८ मीटर रुंद, नागरिकांना दिलासा
मुंबई / नितीन पाटणकर :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) एस विभागाच्या हद्दीत भांडूप पश्चिम येथील लेक रोडवरील हिंद रेक्टिफायर कंपनी ते कैकय्या शेट्टी मार्गांकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तब्बल ७५ अतिक्रमित बांधकामे हटविण्यात आली आहेत. या कारवाईमुळे ३ मीटर रुंद असलेला रस्ता आता १८.३० मीटरपर्यंत रुंद झाला असून नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
* रस्ता अरुंद असल्याने वाहतूक कोंडी, दीर्घ फेरा :-
हिंद रेक्टिफायर कंपनी ते कैकय्या शेट्टी मार्ग हा अतिक्रमणांमुळे अत्यंत अरुंद (फक्त ३ मीटर) झाला होता. त्यामुळे येथे एकावेळी फक्त एकच वाहन जावू शकत होते, परिणामी वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. तसेच गावदेवी व तुळशेतपाडा परिसरातील नागरिकांना लाल बहाद्दूर शास्त्री (LBS) मार्गांकडे जाण्यासाठी तब्बल दोन किलोमीटरचा फेरा पडत होता.
* महानगरपालिकेची धडक कारवाई :-
बुधवारी (१२ मार्च २०२५) झालेल्या या कारवाईत ६२ घरे आणि १३ दुकाने मिळून एकूण ७५ बांधकामे निष्कासित करण्यात आली. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉं. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.
ही कारवाई उपआयुक्त (परिमंडळ ६) संतोषकुमार धोंडे यांच्या देखरेखीखाली आणि एस विभागाचे सहायक आयुक्त भास्कर कसगीकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
* भारी यंत्रसामग्री व मनुष्यबळाचा मोठा ताफा :-
२ बुलडोझर, २ जेसीबी आणि इतर २ वाहने, ८० कामगार, ३० अभियंते आणि १५ पोलिस यासाठी तैनात करण्यात आले होते.
* नागरिकांना मोठा फायदा :-
या कारवाईनंतर रस्त्याची रुंदी १८.३० मीटर इतकी झाली आहे. नागरिकांना आता केवळ ५० मीटरच्या अंतरावरून सहज वाहतूक करता येणार आहे, ज्यामुळे दोन किलोमीटरच्या फेऱ्यापासून सुटका मिळेल.
* निष्कासित रहिवाशांचे पुनर्वसन पूर्ण :-
कारवाईत जे ७५ अतिक्रमित बांधकामे निष्कासित करण्यात आले, त्यामध्ये तळमजला आणि पहिल्या मजल्यापर्यंतची घरे व दुकाने होती. मात्र, येथील रहिवाशांचे या आधीच पुनर्वसन करण्यात आले आहे. ही कारवाई झाल्यामुळे भांडूप पश्चिमेतील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटला असून नागरिकांना सुरक्षित आणि सुलभ वाहतुकीचा मार्ग उपलब्ध झाला आहे.
