खरेदी पत्रामध्ये नमुद क्षेत्राचा ताबा द्यावा !

 

* जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना रिपब्लिकन पार्टी ऑंफ इंडियाचे निवेदन

सातारा / प्रतिनिधी :- कोरेगांव तालुक्यातील चिमणगांव येथील रहिवासी कृष्णात विनायक सावंत यांनी 25 ऑक्टोबर 1996 मध्ये चिमणगावमधील गट क्र. 851 मधील क्षेत्र 2.35 गुंठेचे खरेदीखत केले होते. सदर क्षेत्र त्यांनी मयत श्रीधर शंकर पानस्कर यांच्याकडून कुलरक्कम रूपये 12,000/- मध्ये खरेदी केली होती. या खरेदी दस्तावेळी ते अज्ञान पाल्य होते तसेच त्यांची आई अशिक्षित असल्याने मयत श्रीधर शंकर पानस्कर यांनी त्यांची फसवणूक करून खरेदी पत्रामध्ये नमुद क्षेत्राचा ताबा न देता शेजारील गट नं. 852 मधील शामराव दौलत जाधव यांच्या जागेचा ताबा दिला. सध्या त्या ठिकाणी सावंत यांनी कच्चा पत्राचे घर बांधले असून ते आता जुने व पडीक होत आहे.

दरम्यान, कृष्णात विनायक सावंत यांच्या कागदोपत्री नमुद असलेल्या जागेचा ताबा त्यांना देण्यात यावा, कारण त्यांना आता पक्के घर बांधावयाचे असून त्यांच्या वारसाकडे ह्या गोष्टीची मागणी केली असता त्यांच्याकडून नकारात्मक उत्तर येत आहे. याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया श्रमिक ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश सचिव तुषार तानाजी कांबळे यांनी सातारा जिल्हाधिकारी आणि कोरेगांव तहसीलदार यांना निवेदन देत मागणी केली की, कृष्णात विनायक सावंत यांना खरेदी पत्रामध्ये नमूद केल्याप्रमाणे जागेचा ताबा मिळवून देण्यात यावा. यावेळी आंबेडकर चळवळीचे नेते रमेश उबाळे, कोरेगाव तालुका अध्यक्ष (आरपीआय) दत्ता सावंत, सामाजिक कार्यकर्ता तथा युवा उद्योजका अपर्णा म्हेत्रे, दीपक चव्हाण, समाधान सावंत आदी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post