* ज्येष्ठ नागरिक संस्थेचा रौप्य महोत्सव उत्साहात साजरा
अलिबाग / ओमकार नागावकर :- ज्येष्ठ नागरिक संस्था आज तारुण्यात पदार्पण करीत आहे. 25 व्या वर्षामध्ये जात आहे, असे हृदयस्पर्शी वक्तव्य नितीन अरेकर यांनी श्री मुखरी गणपती देवस्थानच्या भव्य सभा मंडपात चौल येथे आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमात केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले सतीश मनोहर यांनी ज्येष्ठांच्या होणाऱ्या वाढत्या फसवणुकींच्या दृष्टिकोनातून वीज रीडिंग घेण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींकडे फोटो सहित ओळखपत्र असणे बंधनकारक असावे, अशी मागणी महावितरण कंपनीकडे केली, एसटी (ST) बसला असणारे फलक सुस्वच्छ व मोठ्या अक्षरात असावे ज्यामुळे ज्येष्ठांना त्रास होणार नाही म्हणून परिवहन मंडळाकडे विनंती केली. तसेच अनेक समाज व ज्येष्ठ नागरिकांना उपयोगी सर्वसुविधा संस्थेच्या माध्यमातून करण्यात येतात. रौप्य महोत्सवी कार्यक्रमात चौलमधील राष्ट्रीय पातळीवरील आर्चरी स्पर्धेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या अर्जुन म्हात्रे व सई पिलणकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच 85 वर्ष पूर्ण झालेल्या सभासदांचा व ज्या दांपत्यांच्या विवाहास 60 पूर्ण झाली आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे प्राध्यापक नितीन अरेकर यांनी हृदयस्पर्शी वक्तव्याने ज्येष्ठांच्या अनुभवाचे सार आताच्या पिढीसाठी अमृत असल्याचे सांगितले तर आपल्या अध्यापक कारकिर्दीतील विविध अनुभव सांगितले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास म्हात्रे यांनी केले. संस्थेचे सचिव देवानंद पोवळे यांनी आभार मानले. गौतम वैद्य, अविनाश रिसबूड यांनी तबला व सोहम जोशी यांनी संवादिनीवर साथ केली व सदाबहार मराठी गाण्याचा कार्यक्रम सादर केला. यावेळी चौल-नागाव इतर ज्येष्ठ नागरिक संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.