* आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते घरकुलांचे भूमिपूजन
* पंतप्रधान आवास योजनेंतर्गत कुंडलजला कार्यक्रम
कर्जत / प्रतिनिधी :- तालुक्यातील वावळोली ग्रामपंचायती अंतर्गत कुंडलज येथे घरकुलांच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे भूमिपूजन कर्जत-खालापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेंद्र सदाशिव थोरवे यांच्या हस्ते तसेच कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुशांत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमात बोलताना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून घरकुलांचा लाभ अधिकाधिक गरजू लोकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून 2022 पर्यंत सर्व गरजू कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, हा या योजनेचा उद्देश आहे. महाराष्ट्रात 29 लाख घरकुलांचे उद्दिष्ट असून रायगड जिल्ह्यात 22 हजार घरकुल मंजूर झाली आहेत. विशेषतः कर्जत तालुक्यात 1 हजार 830 घरकुल मंजूर झाले असून हा तालुका रायगड जिल्ह्यात घरकुल मंजुरीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
घरकुल लाभार्थ्यांना वेळेत घर बांधण्याचे आवाहन केले. तसेच, लाभार्थ्यांनी मिळालेला निधी फक्त घर बांधण्यासाठी वापरावा आणि संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते मिळतील याची दक्षता घ्यावी, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमप्रसंगी सरपंच एकनाथ भगत, उपसरपंच विद्या खानविलकर, ग्रामपंचायत अधिकारी धनंजय देशमुख, माजी सरपंच हर्षद विचारे, ग्रामपंचायत सदस्य मोरेश्वर भगत, ग्रामपंचायत सदस्य संतोष हिलम, हरिश्चंद्र कांबेरे, दीपक घरत, निलेश थोरवे, विश्वनाथ घरत, चंद्रशेखर चंचे, विनायक खानविलकर, उत्तम ठोंबरे, उत्तम घरत तसेच गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी मोलाची भूमिका बजावली. या माध्यमातून कर्जत तालुक्यातील अनेक कुटुंबांना हक्काचे घर मिळण्याचा मार्ग सुकर झाला आहे.
