* सावरोली टोलनाक्यावरून 'एक्स्प्रेस वे'वर रास्ता रोकोचा इशारा
* भाजपकडून टोल प्लाझा व्यवस्थापकांना टोलमाफीसाठी निवेदन
खोपोली / प्रतिनिधी :- मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवरून खालापूर तालुक्यातील लोक कामानिमित्ताने रोज प्रवास करतात. या दरम्यान सावरोली गावच्या हद्दीत टोलनाका असूनही स्थानिकांना टोल भरण्यासाठी दबावतंत्र वापरले जाते. त्यामुळे खालापूर तालुक्यातील स्थानिकांना टोलसाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. म्हणूनच स्थानिकांच्या वाहनांना टोलमाफी द्यावी, अशी मागणी भाजपने टोल प्लाझा व्यवस्थापक आणि खालापूर पोलिसांकडे निवेदन देत केली आहे. एवढेच नाही तर टोलमाफी न दिल्यास एक्स्प्रेस-वेवर रास्ता रोको आंदोलन करू, असा इशारा भाजपचे खालापूर मंडळ अध्यक्ष सनी यादव यांनी दिला आहे.
एक्स्प्रेस-वेवर खालापूर तालुक्यातील सावरोली गावच्या ठिकाणी टोल नाका आहे. एक्स्प्रेस-वेवरून कामानिमित्ताने दररोज शेकडो ग्रामस्थ प्रवास करतात. त्यामुळे स्थानिकांना वारंवार टोलचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. ही स्थानिकांची फसवणूक असल्याचा त्यांचा आरोप आहे. म्हणूनच स्थानिकांना टोलमधून वगळावे, अशी मागणी भाजपने टोल प्लाझा व्यवस्थापक यांच्याकडे केली आहे. तसे पत्र खालापूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सचिन पवार यांनाही देण्यात आले आहे.
यावेळी भाजपचे नेते नरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, तालुका सरचिटणीस रवी पाटील, युवा मोर्चा कर्जत विधानसभा अध्यक्ष प्रसाद पाटील, युवा मोर्चा खालापूर तालुकाध्यक्ष नागेश पाटील, महिला तालुकाध्यक्षा सुजाता दळवी, युवा मोर्चा सरचिटणीस विशाल लोते, वडगांव जि. प. वार्ड अध्यक्ष विकास लोते, वाहतूक आघाडी तालुकाध्यक्ष हरिभाऊ जाधव, युवा मोर्चा तालुका कार्यकारिणीचे प्रणेश देशमुख, सावरोली पं. स. अध्यक्ष ज्ञानेश्वर पारंगे, नंदनपाडा ग्रामपंचायत सदस्य दत्ताराम पाटील, मोहन घाडगे, रोनित म्हात्रे, राहुल कडव आदी उपस्थित होते.