* मुंबई येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून घेतली विशारद पदवी
कर्जत / विलास श्रीखंडे :- कर्जत तालुक्यातील वदप येथील कृणाल महेश चौधरी याने पखवाज वादन क्षेत्रात सातत्य ठेऊन मुंबई येथील अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयातून विशारद परीक्षा उत्तीर्ण होत मोठ्या यशाला गवसणी घातली आहे. त्याने वयाच्या पाचव्या वर्षापासून मृदुंगाचार्य गुरुवर्य मंगेशबुवा बडेकर देऊळवाडी कर्जत यांच्याकडे पखवाज वादनाचे शास्त्रयुक्त शिक्षण घेण्यास सुरुवात केली होती. कृणाल याने वयाच्या सातव्या वर्षी 2013 मध्ये पखवाज सोलो वादनात प्रथम क्रमांक मिळविला तर 2014 मध्ये मृदुंग व ढोलकी वादनात प्रथम क्रमांक मिळविला आहे.
2017 ला स्कूल ऑफ म्युझिक अँड कल्चरल ऍक्ट ठाणे तर्फे घेण्यात आलेल्या भजन स्पर्धेत उत्कृष्ट वादन म्हणून त्याने प्रथम क्रमांकावर शिक्कामोर्तब केले. 2018 ला श्रीरंग कलानिकेतन तळेगाव दाभाडे येथे कै. पंडित राम मराठे स्मृती राज्यस्तरीय संगीत स्पर्धेमध्ये पखवाज सोलोमध्ये प्रथम क्रमांक मिळविला. 2019 रोजी पुणे येथे झालेल्या बालगंधर्व नाट्यगृहात गुरुवर्य गोविंद गुरुजी कुडाळकर सन्मान सोहळा व ढोलकी स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. 2020 मध्ये कोरोना काळात सुद्धा ऑनलाईन स्पर्धेत भाग घेऊन विविध भागातून प्रथम क्रमांक पटकावले.
वयाची १८ वर्षे पूर्ण होण्याच्या आतच त्याने तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आहे. 2022 ला अभिनव ज्ञान मंदिर महाविद्यालय कला शाखेतून मुंबई विद्यापीठ स्तरावरील अंतिम फेरीत तृतीय क्रमांक मिळविला. तर कर्जत, खोपोली, खालापूर, नेरळ, बदलापूर ,पनवेल, कामोठे, नेरूळ, मुरबाड, शहापूर ,ठाणे अशा विविध भागात आपल्या भावाबरोबर भजन सेवा करताना आपल्या वादनाचे कौशल्य त्याने भजनप्रेमी रसिकांसमोर सादर केले आहे.
अनेक वादन व भजन स्पर्धेत यश मिळवता मिळवता कृणाल याने वयाच्या दहाव्या वर्षापासूनच अखिल भारतीय धर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांच्या पखवाज वादनाच्या परीक्षा देण्यास सुरुवात केली होती. पखवाज वादनाच्या आत्तापर्यंत एकूण सात परीक्षा देऊन कृणालने सातवी विशारद पूर्ण ही परीक्षा देऊन विशारद पूर्ण (B.A.) ही पदवी मिळवली आहे. त्यामुळे त्याच्यावर सगळीकडून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे. आत्तापर्यंतच्या त्याच्या या प्रवासात मार्गदर्शक म्हणून गुरुवर्य मंगेश बडेकर, ग्रामस्थ व कुटुंबातील आधारस्तंभ म्हणून पालकांची मोलाची साथ लाभली आहे.