अंधेरा कायम रहे ! आठवड्याभरापासून दांडवाडी काळोखात !

* वडगांव गृप ग्रामपंचायतीच्या तळवली येथील घटना

*  दांडवाडीतील 80 घरे, 300 लोकांना मरणयातना

* 10 वर्षापासून मिटर नाही, वीज होते वारंवार गुल

* 10 वर्षापासून उघड्यावर करावे लागतात अत्यसंस्कार 

* ग्राम पंचायत व पंचायत समिती प्रशासनाचे दुर्लक्ष

* मुख्यमंत्री, पालकमंत्री, आमदार देणार का न्याय ?

खालापूर / खलील सुर्वे :- आदिवासी समाजाच्या विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रयत्नशील आहेत. विविध योजना राबविल्या जात आहेत, पण खालापूर तालुक्यातील वडगांव गृप ग्रामपंचायत हद्दीतील तळवली दानवाडी येथील 80 घरे व जवळ-जवळ 300 लोक मरणयातना भोगत असल्याचे दिसून येत आहे. मागील 8 दिवसांपासून वाडीतील वीज कनेक्शन बंद झाले असून काळोखच काळोख पसरला आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, खालापूर तालुक्यातील वडगांव गृप ग्रामपंचायत हद्दीत रूची सोया रिफाईन्ड ऑईल व बिरला कार्बन इंडीया प्रा. लि. कंपनीच्या मधोमध दांडवाडी आदिवासी वाडी आहे. या वस्तीत 80 घरे व सरासरी 300 कुटुंबे आहेत. या वाडीत मागील 8 दिवसांपासून वीज बंद आहे. तसेच मागील 10 वर्षापासून या वाडीत वीज मीटर नाहीत. 10 वर्षापूर्वी मीटर जप्त करण्यात आले होते व आजही नवीन मीटर बसविण्यात आले नाहीत. तळवली येथील ट्रान्सफार्मरवरून वीज देण्यात आली आहे, पण ती वारंवार कट होते. ऐवढेच नाही तर वीज पुरवठा कमी दाबाने येत असल्याने सायंकाळी पंखे देखील चालत नाहित, उन्हाळ्यात तर जिवाची लाहीलाही होत असते, अशी प्रतिक्रिया आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तथा रहिवासी विष्णू पवार यांनी सांगितले.

ऐवढेच नव्हे तर या वाडीला हक्काची स्मशानभूमी नसल्याने मागील 10-12 वर्षापासून आदिवासी बांधवांना उघड्यावर अत्यसंस्कार करावे लागत आहे. पावसाळ्यात अतिशय भयानक परिस्थिती निर्माण होते. आकाशातून पाऊस पळत असतो...आणि खाली अत्यसंस्कारासाठी ताराबंळ उडत असते. अंतिम क्षणी तरी योग्य सुविधा मिळावी... स्मशानभूमीला शेड उभारले जावेत, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे. दांडवाडीपासून 2 किमी अंतरावर असलेल्या आंबिवली येथे स्मशानभूमी आहे, तिथे प्रेतयात्रा घेवून जाणे जिकरीचे झाले होते. तसेच लाकड्याची कमतरता निर्माण होत असल्याने शेवटी जंगलाशेजारी आम्ही उघड्यावर अत्यसंस्कार करीत आहोत आणि हक्काची स्मशानभूमी द्यावी, यासाठी ग्राम पंचायत, पंचायत समितीकडे वारंवार पाठपुरावा करीत आहोत. पण गृप ग्रामपंचायत व खालापूर पंचायत समितीने आम्हाला मरायला सोडले आहे, अशी संतप्त भूमिका आदिवासी समाज बांधवांनी मांडली. 

पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होण्यासाठी काही वर्षापूर्वी एका सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला होता. पाण्याचे नळ कनेक्शन घराघरात पोहचले परंतु पाणी मात्र आले नाही. शेवटी बाथरूम, शौचालयासाठी करण्यात आलेल्या कनेक्शनचे पाणी पिण्यासाठी वापरले जात आहे. त्याचप्रमाणे 10 हजार लिटरच्या दोन टाक्या बसविण्यात आल्या असून त्यातून दररोज 30 मिनिट पाणी सोडले जाते. या वेळेत अतिशय कमी पाणी पुरवठा होत असल्याने पाण्याची टंचाई निर्माण होत असते. पीएमजीपी योजनेतून पाण्याची टाकी उभारण्याचे काम मागील अडीच वर्षापासून सुरू आहे, पण अद्याप काम मार्गी लागलेले नाही. 

पिण्यासाठी पुरेसे पाणी नाही...उघड्यावर अत्यसंस्कार करावा लागत आहे...आठवडा आठवडा वीज बंद...घराघरात वीज मीटर नाही...डासांनी नागरीक हैराण...अशा विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या दांडवाडी आदिवासी समाज बांधवांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आदिवासी मंत्री अशोक उईके, रायगड जिल्ह्यातील मंत्री अदिती तटकरे, भरतशेठ गोगावले, खासदार श्रीरंग आप्पा बारणे, आमदार महेंद्र थोरवे, कोकण आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, कर्जत प्रातांधिकारी, खालापूर तहसिलदार, खालापूर गटविकास अधिकारी, वडगांव गृप ग्रामपंचायत ग्रामसेवक, प्रशासक व स्थानिक लोकप्रतिनिधी, नेते लक्ष देणार का? की 300 आदिवासी समाज बांधवांना मरायला सोडले आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post