* चैतन्य कर्ण कानिफनाथ पालखी पायी दिंडी सोहळा
* नाथभक्तांना उपस्थितीचे तुषार वेखंडे यांचे आवाहन
खोपोली / मानसी कांबळे :- सालाबादप्रमाणे ॐ चैतन्य कर्ण कानिफनाथ पालखी पायी दिंडी सोहळा 9 मार्च ते 20 मार्च रोजी आयोजित करण्यात आला आहे. गुरुकृपेमुळे तसेच नाथ साधुसंताच्या कृपाशिर्वादाने ॐ गोरक्षयोगी आस्थान आटगाव येथे 9 मार्च रोजी नाथभक्त तुषार वेखंडे यांच्या आयोजनातुन मोठ्या संख्येने नाथभक्त उपस्थित राहणार आहेत. यावेळी गुरुवर्य यांचे आशीर्वाद मार्गदर्शन, नाथांचे पालखी पुजन, आरती, भजननंतर भोजन हे पालखी सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम होणार आहेत.
नवनाथ परंपरेतील नऊ महायोगींपैकी एक मानले जाणारे कानिफनाथ भक्तांच्या हृदयात एक विशेष स्थान ठेवतात. त्यांची समाधी किंवा अंतिम विश्रांती स्थान, महाराष्ट्रातील अहिल्यानगर (अहमदनगर) जवळील मढी येथे आहे. पवित्र भागवत पुराणात उल्लेख केल्याप्रमाणे कानिफनाथ हे प्रबुद्ध नारायणाचे अवतार आहेत, असे मानले जाते.
रंगपंचमी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. या दिवशी नाथसमाधी दिन आणि संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त लाखों भाविक श्री कानिफनाथांच्या समाधी दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. या पवित्र दिवशी नाथसिद्धांचे आखाडे, विविध ठिकाणाहून आलेल्या मानाच्या काठ्या व पालख्या मढीमध्ये दाखल होतात. मानाच्या काठ्या वाजत-गाजत नाथांच्या मंदिराच्या कळसाला लावण्यात येतात. भाविकांकडून मंदिरावर रेवड्यांची उधळण केली जाते. भाविक भक्त नाथांच्या समाधीला गलफ (वस्त्र), पुष्पहार, दवना, सुगंधी अत्तर, रेवडी आणि मलिद्याचा (चपाती, गूळ, तूप व बडीशोप एकत्र केलेला) प्रसाद अर्पण करतात. यावेळी नाथांच्या जयजयकाराने व डफ ढोल-ताशांच्या गजराने मंदिर परिसर दुमदुमुन जातो. येथील गाढवांचा बाजारही सुप्रसिद्ध आहे.

