खोपोली / मानसी कांबळे :- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये खोपोली शहरातील सर्व मालमत्ताधारकांना नगर परिषदेकडून घरपट्टीची बिले बजाविण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे थकबाकीदार यांना जाहीर सुचना, नोटीस तसेच महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १५२ नुसार जप्तीचे अधिपत्रसुद्धा बजाविण्यात आलेली आहेत. तसेच घंटागाडी व रिक्षाद्वारे सुद्धा घरपट्टी भरण्याबाबत जाहीर आवाहन करण्यात आलेले आहे. असे असून सुद्धा मालमत्ताधारक, गाळेधारक व औद्योगिक संस्था घरपट्टी भरण्याकडे नागरीक कानाडोळा करीत आहेत. घरपट्टीवसुली संदर्भात शासनाकडून वारंवार आढावा बैठक व व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (V.C.) द्वारे नगर परिषदेला विचारणा होत आहे. याबाबत प्रशासक व खोनप मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली शहरामध्ये वसुलीसाठी ५ पथके तयार करण्यात आली असून घरपट्टी वसुलीसाठी जप्तीची धडक कारवाई चालू करण्यात आली असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले. दरम्यान या कारवाईमध्ये मौजे चिंचवली, मुळगाव (MIDC) या भागामध्ये व्यावसायिक (Commercial) गाळे व एस. के. व्हील शोरूम व सुप्रीम कंपनीला टाळे ठोकण्यात आले आहे.
याबाबत प्रशासक व मुख्याधिकारी यांनी नागरिकांना त्वरीत घरपट्टी भरण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नगर परिषदेकडून रहिवासी संकुल (मोठ्या सोसायटी) येथे घरपट्टी वसुली कँपचे सुद्धा आयोजन केले आहे. तरी नगर परिषदेकडून जप्तीची कटू कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी आपला कर तात्काळ भरावा व नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
* ऑनलाईन (ONLINE) कर भरता येईल :-
नगर परिषदेचा कर भरणा करण्याकरीता GOOGLE वर जावून MAHAULB.IN या संकेतस्थळावर जावून ONLINE PAYMENT ऑप्शनवर क्लिक करून KHP000...असा आपला मालमत्ता क्रमांक नोंद करून ONLINE कर भरणा करू शकतो, असेही सांगण्यात आले आहे.
