* साईभक्तांनी घेतला दर्शन व महाप्रसादाचा लाभ
* साईबाबांच्या भजनांनी साईभक्त झाले मंत्रमुग्ध
कर्जत / नरेश जाधव :- कडाव गावातील सामाजिक कार्यकर्ते तथा आयोजक चेतन पवाळी यांच्या सहकार्याने मागील १४ वर्षांपासून श्री क्षेत्र कडाव ते श्री क्षेत्र शिर्डी अशी साईबाबांची पालखी काढली जाते. ह्या वर्षी साई पालखी सोहळ्याचे १४ वर्षे असून साई पालखीचा भंडारा गुरुवार, २ जानेवारी २०२४ रोजी मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
शनिवार, २१ डिसेंबर २०२४ ते शुक्रवार २७ डिसेंबर २०२४ ह्या कालावधीत ओम साई मित्र मंडळ आयोजित श्री क्षेत्र कडाव ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कडाव गावात पार पडलेल्या साई पालखी सोहळ्याने भक्तीमय वातावरण निर्माण केले होते. पहाटे साईबाबांच्या मंगल आरतीने पदयात्रा पालखी सोहळ्याच्या कार्यक्रमाची सुरुवात झाली. पालखी सोहळ्यात साईंच्या मूर्तीची आकर्षक सजावट करण्यात आली होती.
गुरुवार, २ जानेवारी २०२५ रोजी श्री क्षेत्र कडाव ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचा भंडारा साईभक्त तसेच आयोजक चेतन पवाळी यांच्या कडाव येथील साई सदन येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हजारों साईभक्तांनी या सोहळ्यात सहभाग घेतला आणि साईबाबांचे दर्शन घेतले.
या सोहळ्यादरम्यान शिवतेज म्युझिकल गृप खोपोलीचे गायक महेश बुवा देशमुख, गायक अल्केश कर्णुक, गायिका हर्षदा सालेकर, तबला ओमकार कराळे, पखवाज सुशांत सालेकर, ऑक्टपॅड विवेक पंते, ऑर्गन पराग जाधव, साऊंड मनोज देशमुख यांनी सादर केलेल्या साईबाबांच्या भक्तीमय गीताने वातावरण मंत्रमुग्ध झाले होते.
यावेळी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ हजारों भक्तांनी घेतला. साईभक्तांच्या उपस्थितीने कडाव गावात आनंदाचे आणि भक्तीचे वातावरण निर्माण झाले होते. साई पालखी सोहळ्याच्या माध्यमातून एकात्मतेचा संदेश दिला गेला आणि भक्तांनी साईबाबांच्या आशीर्वादाने आपले जीवन समृद्ध करण्याची प्रेरणा घेतली. कार्यक्रमाचे नियोजन आणि यशस्वी आयोजनासाठी ओम साई मित्र मंडळ व गावातील सर्व स्वयंसेवकांचे विशेष योगदान होते. कडाव गावातील हा साई पालखी सोहळा यंदाही भाविकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला.