खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने बाळशास्त्री जांभेकरांना अभिवादन करीत पत्रकार दिन साजरा

 


खालापूर / जतिन मोरे :- आद्य संपादक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 6 जानेवारी रोजी खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने मराठी पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व ज्येष्ठ पत्रकार हनुमंतराव ओव्हाळ, साहित्यिक बंधू अभंगे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.       

आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील योगदान आणि समाज जागृतीसाठी त्यांनी केलेल्या कार्याचे स्मरण करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात डॉं. रविंद्र जाधव यांनी पत्रकारितेच्या मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले. तसेच न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन या पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी यांनी देखील पत्रकारांना आरोग्य विमा संरक्षण, बँकेकडून कर्ज आदी सोयीसुविधा शासनाकडून मिळायला हव्या, यावर प्रकाश टाकला तर अन्य वक्त्यांनी पत्रकारितेतील आव्हाने आणि जबाबदाऱ्यांवर प्रकाश टाकला. पत्रकार दिनानिमित्त उपस्थित पत्रकारांनी एकत्रितपणे समाजासाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले ॲंड. रमेश पाटील यांनी सरपंच पदाचा पदभार स्विकारल्यानंतर गोरठण बुद्रुक ग्रामपंचायतमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच बँक ऑफ इंडियाचे खालापूर शाखेचे व्यवस्थापक अश्विन मेश्राम यांनी देखील बँकेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेकडून शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाला खालापूर तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष डॉं. रविंद्र जाधव, सचिव जतिन मोरे, स्वामी विवेकानंद शाळा खालापूरचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष फिरोज पिंजारी, व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे खालापूर तालुकाध्यक्ष दीपक जगताप, न्यूज जर्नालिस्ट असोसिएशन राष्ट्रीय महिला महासचिव मानसी गणेश कांबळे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकर पवार, सुरेश दिघे, आशिष लोखंडे, एस. आर. कोकणे सर तसेच तालुक्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post