चंद्रकांत भोसले यांना शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार जाहीर

 


अ. नगर / प्रतिनिधी :- येथील शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने एकंदरीत साहित्यिक कार्याचा विचार करून माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांना त्यांच्या साहित्यिक कार्याबद्दल जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे व सचिव सुनील गोसावी यांनी दिली.  

दरवर्षी साहित्य संमेलनात साहित्य व सामाजिक क्षेत्रातील दोन प्रज्ञावंतांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी ९ फेब्रुवारी रोजी डॉं. संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सहकार्याने सोळावे राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनात माजी प्राचार्य चंद्रकांत भोसले यांना गौरवण्यात येईल. चंद्रकांत भोसले हे महाराष्ट्र सरकारी  व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई या खात्यांतर्गत गणित निर्देशक, गटनिर्देशक, प्राचार्य, मुख्याध्यापक, निरीक्षक, उपजिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी अशा विविध पदावर परिणामकारक काम केले आहे. त्यांनी अहमदनगर, नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यातल्या विविध औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि तांत्रिक विद्यालयात सेवा केली आहे. 

त्यांचा धग हा काव्यसंग्रह, बहुजन साहित्य भान आणि भूमिकालेख संग्रह, मृत्युदंड व दोन बाल एकांकिका, कांशीराम एक ध्येयवेडे वादळ, सफर विज्ञानाची आदी पुस्तके प्रकाशित आहेत. व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने इयत्ता बारावीच्या एमसीव्हीसी करीता असलेल्या एकूण बारा पुस्तकांचे लेखनासाठी समन्वयक म्हणून त्यांनी काम केले आहे. भावशाची पत्रे व झिम्माड या कादंबरी त्यांनी लिहिलेले असून भावशाची पत्रेचे ई कॉमिक्स व डी- कॉमिक्स ही प्रकाशित झालेले आहे.त्यांची आठवणीतली आजी ही कादंबरी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे. 

विविध वर्तमानपत्र आणि साप्ताहिक, मासिकांमधून कविता, ललित, उद्योजकता या विषयावरचे त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. आकाशवाणीवरूनही त्यांच्या काव्यवाचनाचे तसेच कथावाचन व औद्योगिक सुरक्षेविषयी भाषणे  झाली आहेत. महाराष्ट्र शासनाचे दोन उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार त्यांना मिळालेले असून मुंबई नाटककार संघाचा मृत्युदंड या एकांकिकेच्या लेखनासाठी उत्कृष्ट एकांकिका पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. 

शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाचकपीठ नावाची चळवळ त्यांनी सुरू केली असून त्या माध्यमातून आजपर्यंत ५६ काव्यसंग्रहांवर ऑनलाईन चर्चा झालेली आहे. त्यांच्या साहित्यिक कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार २०२५ त्यांना जाहीर करण्यात येत आहे. यापूर्वी प्रा. मेधाताई काळे, कवी चंद्रकांत पालवे, कॉं. बाबा आरगडे, बापूसाहेब भोसले, शिरीष मोडक, प्राचार्य डॉं. बाळ कांबळे, उत्तमराव पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे.

प्राचार्य चंद्रकांत भोसले यांचे शब्दगंधचे कार्याध्यक्ष ज्ञानदेव पांडुळे, कार्यवाह भारत गाडेकर, उपाध्यक्ष प्राचार्य डॉं. जी. पी. ढाकणे, जयश्री झरेकर, खजिनदार भगवान राऊत, प्रा. डॉं.अनिल गर्जे, प्रा. डॉं. तुकाराम गोंदकर, नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, राजेंद्र चोभे, बबनराव गिरी, शिरीष जाधव, राज्य संघटक डॉं. अशोक कानडे यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post