रायगड / प्रतिनिधी :- उद्योजकांनी सुयोग्य तंत्रज्ञानाची व नवीन उत्पादनाची निवड करावी आणि व्यवस्थापनातील दर्जा व त्यांच्या घटकाची निकोप वाढ व्हावी यासाठी सुक्ष्म व लघु उद्योजकांना प्रेरित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १९८५ पासून जिल्हा पुरस्कार योजना कार्यान्वित केली आहे. सदर पुरस्कार प्रत्येक कैलेंडर वर्षामध्ये पात्र सुक्ष्म व लघु उद्योग घटकांना देण्यात येतात.
या योजनेअंतर्गत मोठ्या संख्येने उद्योजकांचे अर्ज प्राप्त होण्यासाठी या योजनेबाबत जिल्हयातील सर्व औद्योगिक संघटनांना त्यांच्या सदस्य उद्योजकांनी अधिकाधिक संख्येने अर्ज करावेत यासाठी आवाहन केले जाते. शासनाने निश्चित केलेल्या निकषांच्या आधारे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून विजेत्या उद्योजकांची / घटकांची निवड केली जाते. निवड करण्यात आलेल्या उद्योजकांना प्रथम पारितोषिक रु. १५,०००/-, सन्मान चिन्ह तसेच व्दितीय पारितोषिक रु. १०,०००/- सन्मान चिन्ह देण्यात येते.
अधिकाधिक सुक्ष्म व लघु उद्योजकांनी त्यांच्या तंत्रज्ञान, कार्यपध्दती, व्यवस्थापन कौशल्य, उत्पादकता आणि उत्पादनातील नाविन्य, संशोधन व विकास आदीबाबत सुधारणा करावी यासाठी उद्योजकांना प्रेरित करण्याच्या हेतुने सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करुन विजेत्यांचा सत्कार करणे ही या योजनेमागील भूमिका आहे.
* जिल्हा पुरस्कार योजनेचा लाभ घेणाऱ्यांची पात्रता :-
१. ज्या घटकांनी यापुर्वी राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय व जिल्हा पुरस्कार मिळालेले आहेत असे घटक या पुरस्कारास पात्र होणार नाहीत. २. उद्योग संचालनालयाकडे कमीत कमी मागील ३ वर्षाच्या कालावधीमध्ये स्थायीरित्या सुक्ष्म व लघु उद्योग नोंदणी म्हणून नोदणीकृत झाले असले पाहिजे. ३. मागील २ वर्षात सलग उत्पादन करत असणारे घटक पात्र ठरतील. ४. अर्जदार वित्तीय संस्थेचा थकबाकीदार नसावा.
पात्रता असणाऱ्या सूक्ष्म व लघु उद्योजकांनी या योजनेचा लाभ घेण्याकरीता विहित नमुन्यात अर्ज जिल्हा उद्योग केंद्र, रायगड बाजारासमोर, ठिकरुळ नाका, अलिबाग, जिल्हा- रायगड, ईमेल आयडी didicraigad@gmail.com द्वारे सादर करावा. अधिक माहितीसाठी एस.एस. बिराजदार, व्यवस्थापक (संपर्क क्रमांक ८४८५८१०६५६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जी. एस. हरळय्या, महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र, रायगड-अलिबाग यांनी केले आहे.