* हजारों भाविकांनी घेतला जियारतचा लाभ !
पेण-खोपोली / खलील सुर्वे :- पेण येथील हजरत पीर सय्यद बद्रुद्दीन शाह हुसैनी चिश्ती (र.अ.) बाबांचा उरूस महोत्सव मोठ्या जल्लोषात मंगळवार दि.१४ ते १५ जानेवरी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेल्या अनेक पिढ्यांपासून हा उर्स भक्तीभावाने साजरा केला जातो. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उरुस काळात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन झाले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेला पेणच्या हजरत पीर सय्यद बद्रुद्दीन शाह हुसैनी चिश्ती (र.अ.) बाबांचा उरूस मोठ्या उत्साहात साजरा झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यामध्ये डोंगर परिसरात वसलेल्या जंगलात मोठा उरुस भरतो. या ठिकाणी महाराष्ट्रासह विविध राज्यातील सर्वधर्मीय भाविक या उरुसामध्ये सहभागी होत असतात. या उरुसाला मंगळवारपासून सुरुवात झाली असून या ठिकाणी सर्वधर्मीय भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत आहे. पेण तालुक्यामध्ये हजरत पीर सय्यद बद्रुद्दीन शाह हुसैनी चिश्ती (र.अ.) बाबा यांची दर्गा डोंगर परिसरात वसलेल्या जंगलात आहे. या दर्गामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून उरुस भरविला जातो. दरवर्षीनुसार यावर्षीही हा उरुस भरविण्यात आला आहे.
उरुसाची परिस्थिती लक्षात घेता यावर्षी पोलिसांनी या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला होता. दर्ग्याच्या परिसरात फुले, चादर, अत्तर सुगंध, टोपीची दुकाने तसेच लहान मुलांनाचे खेळणी, कपडे, जिलेबी, मिठाई, हलवा पराठे, हॉटेल, टी-स्टाल, मुलांसाठी खेळणी, जमपिंग जिपाक, रेलगाडी, आकाश पाळणा लावण्यात आले होते. उरूसाच्या निमित्ताने दर्गेला करण्यात आलेली विद्युत रोषणाई ही भाविकांना आकर्षित करणारी ठरत होती. तसेच रात्री ग्यारवी शरीफ कार्यक्रमानंतर संदलची मिरवणूक काढून दर्गातील मजारला अर्पण करण्यात आली. जियारतसाठी आलेल्या भाविकांनी गिलाफ, गुलाब फुलांची चादर, मजारला अर्पण करीत नियाजचा लाभ घेतला. जियारतसाठी येणाऱ्या भाविकांना जेवणची लंगर (नियाज) सोय करण्यात आली होती. सर्व धार्मिक विधींसाठी दर्गा कमिटी मुजावर, मुस्लिम बांधव व मौलवी यांची उपस्थिती होती. बाबांच्या दर्ग्यांवर आपले संकट दूर होण्यासाठी विविध मन्नती केल्या जातात व त्या पूर्ण होतात, अश्या विश्वासाने मन्नती केल्या जातात. मन्नती पूर्ण झाले की भाविक आपल्या कुटूंबासॊबत जागोजागी नियाज (जेवण) बनून वाटप करण्यात येते. गरीब, गरजू लोकांना सदका खैरात दान करीत त्यांची मदत करण्यात येते. भाविकांची मोठी श्रध्दा असल्याने दरवर्षी उर्सला भाविकांची मोठी उपस्थिती असते.