वसई / प्रतिनिधी :- बुधवार, २२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ठिक ५.३० वाजता स्व. फ्रान्सिस डिसोजा सभागृह, लोकसेवा मंडळ बंगली, सांडोर, वसई येथे आंतरराष्ट्रीय सहकार परिषद २०२५ च्या नियोजनासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघरचे शिरीष कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली पालघर जिल्ह्यातील पतसंस्था, को. ऑप. हौ. सोसायटीचे पदाधिकारी यांच्यात संवाद साधण्यात आला. पालघर जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सहसचिव शरद जाधव यांनी महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने ८ व ९ फेब्रुवारी २०२५ या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचे आयोजन आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त "सहकार दिंडीचे" नियोजन यासंदर्भात बहुमूल्य असे मार्गदर्शन केले.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी सहकारी पतसंस्थांची प्रतिष्ठा वाढावी, हा आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेचा उद्देश आहे, परंतु त्याचबरोबर सहकारी पतसंस्था चळवळीचे शक्ती प्रदर्शन, संघटनेची ताकद, एकजुटीचे दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला विशेषतः सहकार खात्याला व शासनाला झाले पाहिजे. आपल्या विविध प्रश्नांवर सहकार खात्याशी आपण चर्चा करतो, प्रसंगी वादही होतात. यामागे आपला उद्देश सहकार खात्याशी वाद करणे हा नसून आपल्या प्रश्नांची तड लागावी, हा असतो. सहकार खाते व पतसंस्थांची संघटना यांनी हातात हात घालून काम केल्यास ही चळवळ भक्कम व सदृढ होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी सहकार दिंडीचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे प्रस्तावित करून पहिली दिंडी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मारकाला अभिवादन करून, सहकार चळवळीचे जनक स्व. धनंजयराव गाडगीळ यांच्या नावाने मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात भ्रमण करीत पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून सहकार दिंडी, पुणे व उत्तर महाराष्ट्र मार्गक्रमण करीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकार चळवळीचे जनक स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या समाधीस अभिवादन करण्यात येईल.
दुसरी दिंडी सहकाराचे जनक कै. वैकुंठभाई मेहता यांच्या नावाने नागपूरहून प्रस्थान होऊन अमरावती, अकोला, बुलढाणा, चिखली, छत्रपती संभाजीनगर मार्गे धाराशिव, बीड जिल्ह्यातून अहिल्यानगरकडे येईल अशाप्रकारे दोन्ही बाजूच्या दिंडी, ज्यांनी आशिया खंडातील पहिला साखर कारखाना सहकारी तत्वावर काढला ते स्व. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जन्म व कर्मभूमी असलेल्या लोणी (प्रवरानगर) स्मारकाला अभिवादन करून शिर्डी या ठिकाणी उपस्थित राहतील. तरी मुंबईहून निघालेली दिंडी ठाणे येथे दि. 30 जानेवारी २०२५ दुपारी ३ वाजता येणार असून पालघर जिल्ह्यातील सर्व पतसंस्था को. ऑप. हौ. सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे हजर राहून दिंडीचे स्वागत करावे, असे जाहीर आव्हान शरद जाधव व शिरीष कुलकर्णी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांनी केले. चंद्रकांत वंजारी उप कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन यांनी ही बहुमोल मार्गदर्शन केले, यावेळी पालघर जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशनचे सरचिटणीस अल्बर्ट अथाईड, अमर शिंदे उपनिंबधक सहकारी संस्था वसई यांच्यासह विविध पतसंस्थांचे पदाधिकरी को. ऑंप. हौ. सोसायटीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
