कर्जत / विलास श्रीखंडे :- रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील खोपोली या ठिकाणी टाटा कंपनीमार्फत ऊर्जा मेळा २०२४ या प्रतिष्ठीत राष्ट्रीय पातळीवरील उपक्रमाचे आयोजन खोपोली येथे करण्यात आले होते. या उपक्रमाचा मुख्य उद्देश शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) शिक्षणाचे महत्त्व वाढविणे हा आहे. यामध्ये सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी विज्ञान, प्रश्नमंजुषा स्पधी तसेच विज्ञान, चित्रकला स्पर्धा यांचे तर इयत्ता ९ वीसाठी विज्ञान कार्य मॉडेल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
विज्ञान कार्य मॉडेल स्पर्धेमध्ये परिसरातील २८ शाळांनी सहभाग नोंदविला होता. ऊजनिर्मिती, ऊर्जा संवर्धन प्रदुषण, जैव विविधता, सौर ऊर्जा इ. विषयांवर त्यांनी विविध मॉडेल्स बनविले होते. यात गौळवाडी माध्यमिक विद्यालय व गौळवाडी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविलेल्या पर्यावरण स्नेही या प्रकल्पाला पहिला क्रमांक प्राप्त झाला. त्यामुळे पुढील फेरीसाठी दिल्ली येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी जाण्याची संधी गौळवाडी येथील विद्यार्थ्यांना मिळाली आहे. या प्रकल्पामध्ये दिव्या तुकाराम तरे व श्रेया जयवंत बार्शी या विद्यार्थीनींनी आपला सहभाग नोंदविला. तर पोस्टर मेकिंग स्पर्धेमध्ये याच विद्यालयातील इयत्ता आठवीत शिकणाऱ्या नियती अनंता काजारी हिने तृतीय क्रमांक पटकाविला आहे. या विशेष उपक्रमात यशस्वी कामगिरी बजाविणाऱ्या सर्व यशस्वी व सहभागी विद्यार्थ्यांना टाटा पॉवर कंपनीकडून प्रमाणपत्र आणि विविध स्वरुपाचे बक्षिस देवून गौरविण्यात आले.
या स्पर्धेसंदर्भात गौळवाडी येथील विद्यार्थ्यांना शाळेतील विज्ञान शिक्षिका सायली पंदेरे, वसंत मोरे सर यांनी अनमोल मार्गदर्शन केले. त्यामुळे या घवघवीत मिळालेल्या यशाबद्दल त्यांच्यावर गौळवाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांसह अभिनव ज्ञान मंदिर संस्था संचालक मंडळ कर्जत आणि शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षणप्रेमींकडून गौळवाडी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक यांच्या कार्याचे विशेष कौतुक सर्वत्र होत आहे.
