नगरपंचायतीवर खालापूरकर धडकले!

 

* मालमत्ता करवाढ विरुद्ध ठिय्या आंदोलन

खालापूर / प्रतिनिधी :- खालापूर नगर पंचायतीच्या मालमत्ता करातील वाढीविरोधात शुक्रवारी मोठ्या संख्येने खालापूर नगर पंचायत हद्दीतील नागरिकांनी  नगर पंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करीत  मासिक बैठकीत प्रस्तावित करवाढ रद्द करण्याचा ठराव समंत करण्यास भाग पाडले. मालमत्ता करात भरमसाठ वाढीचा प्रस्ताव खालापूर नगरपंचायतीने घेत प्रस्तावित कराबाबत नोटीस देण्यात आल्या होत्या. नोटीस बजावताना त्यामध्ये पुढील पाच वर्षात होणारी करवाढ चुकीच्या पद्धतीने असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर रोष वाढला होता. शुक्रवारी नगर पंचायतीची मासिक बैठक असल्याची माहिती नागरिकांना मिळाली होती. या बैठकीच्या पूर्वीच करवाढीवर फैसला व्हावा यासाठी नागरिकांनी शुक्रवारची वेळ निवडत हे आंदोलन केले. 

मासिक बैठकीत विषय पत्रिकेवर मालमत्ता करवाढ संदर्भात चर्चा करण्यात येणार असल्याचे उपनगराध्यक्ष संतोष जंगम यांनी जमलेल्या नागरिकांना सांगितल्यानंतर मासिक बैठक सुरू झाली. कोणत्याही परिस्थितीत मालमत्ता करवाढ नागरिकांवर लादली जावू नये यासाठी नागरिक कार्यालयाबाहेर संताप व्यक्त करीत होते. विषय पत्रिकेवर मालमत्ता करवाढ संदर्भात ठोस निर्णय घ्या, अन्यथा नगर पंचायत बरखास्त करा, अशी मागणीच नागरिक बाहेरून करीत होते. नागरिकांच्या उग्र भावना लक्षात घेऊन मासिक बैठकीत मालमत्ता करवाढीला एकमताने विरोध असल्याचा ठराव घेण्यात आला. 

शुक्रवारी मोठ्या संख्येने नागरिक नगर पंचायत कार्यालयाबाहेर जमले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पाण्याची प्रचंड समस्या असताना महिला वर्गांच्या डोक्यावर हंडा उतरलेला नसताना देखील पाणीपट्टी दुप्पट केली आणि आता मालमत्ता कर भरमसाठ वाढविता त्यापेक्षा आमची ग्रामपंचायत बरी होती, असा सूर महिलांनी काढला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Post a Comment

Previous Post Next Post