खोपोली / खलील सुर्वे :- 15 तालुक्याचा कारभार हाकलत असलेले रायगड जिल्हाधिकारी कार्यालय...नारळ, सुपारीच्या बागेत...समुद्र लगत निसर्गाच्या सुंदर वातावरणात असून या कार्यालयामध्ये असणाऱ्या शौचालयाची इमारत लाजिरवाणी अवस्थेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गावागावात स्वच्छतेचे आवाहन करणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील सार्वजनिक स्वच्छतागृहाची अवस्था पाहण्यालायक नाही. स्लॅबच्या प्लास्टरचे तुकडे कोसळले असून लोखंडी सळ्या कुजलेल्या अवस्थेत आल्याचे चित्र या शौचालयामध्ये दिसून येत आहे. उभ्याने लघवी करण्याचे मोडके भांडे, पाईप...नळ आहेत पण पाणी गुल...शौचालयामध्ये हगणदारीसाठी भांडे आहे पण नळ पाणी गुल...टाईल्स छान पण त्यावर काळ्या रंगाची रंगरंगोटी, वॉश बेसिन आहे पण एक नळ चंद्रासारखा गोल फिरता तर एक बंद अवस्थेत...त्यात पाण्याअभावी लांबूनच प्रचंड मुतारीचा उग्र वास...जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षाशेजारी असणाऱ्या स्वच्छतागृहातील शौचालयास कुलूप पहावयास मिळत असल्याने कार्यालयाबाहेर असणारे शौचालय धोकादायक असून आत जावे की नाही ? असा प्रश्न तालुक्यातून आलेल्या नागरिकांसमोर उभा रहात असल्याचे नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीच्या भिंतीला देखील अनेक ठिकाणी तडे गेले असून पिलरचे प्लास्टर कोसळून आतली लाल भडक विटांचे थर दिसून येत असून खिडकीच्या लेंटरचे प्लास्टर कोसळून आतल्या लोखंडी सळ्या कुजलेल्या अवस्थेत असल्याचे चित्र इमारत पाहिल्यावर दिसून येत आहे. रायगड जिल्हा कार्यालयातील शौचालयाची व इमारतीची ही अवस्था असेल तर 15 तालुक्यातील कार्यालयांची अवस्था काय असणार? असा प्रश्न हे इमारतीचे चित्र पाहिल्यावर उपस्थित होत आहे. पंधरा तालुक्यातून तासन्तास प्रवास करून कोणत्या न कोणत्या शासकीय कामानिमित्ताने वाडी वस्तीतील ग्रामस्थ या जिल्हा कार्यालयामध्ये येतात मात्र हगणदारीसारखी मूलभूत सुविधा येणाऱ्या ग्रामस्थांसाठी नसेल तर त्यांनी उघड्यावर हगणदारी करावी का? प्रत्येक कार्यालयात जनता जनार्दनासाठी बसण्यासाठी बाकडे, खुर्च्या, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहाची सोय का केली जात नाही. लोकप्रतिनिधी, श्रीमंत व्यावसायिकांना व्हीआयपी रूमची उत्तम सोय केली जाते, पण जनता जनार्दनाला मूलभूत सुविधांपासून वंचित का ठेवले जाते? कोट्यवधी रुपये इमारतीसाठी खर्च केल्या जातात पण कामांना दर्जा का मिळत नाही? प्रशासनाला जाग येणार तरी कधी? असा सवाल जनता जनार्दनांमधून विचारला जात आहे.