* व्हीपीडब्ल्यूए संस्थेचे सर्वतोपरी सहकार्य
खोपोली / प्रतिनिधी :- दरवर्षी प्रमाणे यंदाही खोपोलीतील भटक्या कुत्र्यांना अँटी रेबीज लस देण्याचे अभियान व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष डॉं. राहुल मुळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था, श्री कृपा एक्वेरियम - खोपोली, लायन्स क्लब ऑफ - खोपोली, रोट्रॅक्ट क्लब ऑफ - खोपोली आणि शहरातील प्राणी मित्रांच्या माध्यमातून राबविण्यात आले. जवळपास पंधरा दिवस खोपोली शहरातील विवीध भागात हे अभियान राबविण्यात आले आणि त्याद्वारे 700 हून अधिक भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली.
या अभियानासाठी खालापूर तालुक्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत कदम, खालापूर तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉं. काळे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉं. पंकज पाटील, खोपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत, लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेतर्फे गुरुनाथ साठेलकर आणि विजय भोसले यांच्यासह अनेक सदस्य तसेच शहरातील प्राणी मित्रांनी या मोहिमेत सहभाग घेतला. श्री कृपा एक्वेरियमचे संचालक प्रवीण शेंद्रे यांनी या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावली.
आंतरराष्ट्रीय रेबीज दिनाच्या निमित्ताने दरवर्षी लसीकरणाचे अभियान राबवले जाते. यंदाचे हे पाचवे वर्ष होते. मागील वर्षी जवळपास पाचशे भटक्या कुत्र्यांना लस देण्यात आली होती तर यंदा त्याहीपेक्षा जास्त संख्येने लसीकरण करण्याचा संकल्प केला गेला होता, त्यानुसार यंदा या अभियानाचा शुभारंभ दि. 6 ऑक्टोंबर 2024 रोजी झाला होता. खोपोली शहरातील भटक्या कुत्र्यांच्या दंशामुळे हबकलेल्या खोपोलीकरांना या निमित्ताने काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
हिमालया हेल्दी पेट फूड, ड्रुल्स पेट फूड, ऑरेंज पेट, कार्नीवेल पेट फूड, मिस्टिक इत्यादी कंपन्यांनी या मोहिमेसाठी डॉग फूड पुरवले होते. तसेच व्हेटर्नरी प्रॅक्टिशनर्स वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून लसीकरणाची व्यवस्था केली गेली आणि डॉं. राहुल मुळेकर, डॉं. विष्णू काळे, डॉं. प्रशांत बिराजदार, डॉं. आसाराम काळे, डॉं. शशिकांत थोरात, सागर कसबे यांनी प्रत्यक्ष योगदान दिले आहे.