* 22 सप्टेंबर 2024 रोजी ताज हॉटेल, मुंबई येथे करण्यात आला गौरव
खोपोली / प्रतिनिधी :- सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून भरीव सामाजिक कार्य करणाऱ्या इशिका शेलार यांनी समाजासाठी भरीव योगदान दिलेले आहे. समाजातील विविध घटकांनी या सामाजिक कार्याबद्दल त्यांचा गौरव केलेला आहे.
कोरोना काळात कोरोनामुळे मृत झालेल्या मृतांचे अंत्यविधी करणारी रायगड जिल्ह्यातील पहिली महिला असलेल्या इशिका शेलार यांनी कोरोना झालेल्या रुग्णांना व नातेवाईकांना सहज सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून नि:शुल्क जेवणाचे डबे पुरवितांना महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात आगळीवेगळी ठरलेली वीटभट्टी कामगारांच्या मुलांसाठी चालवलेली निसर्ग शाळा ही समाजासाठी मैलाचा दगड ठरलेली आहे. याशिवाय संस्थेच्या माध्यमातून सलग 4 वर्ष पार पडलेले जोडप्यांचे सामुदायिक विवाह सोहळे यामध्ये पार पाडण्यात प्रमुख भूमिका बजावताना संस्थेच्या माध्यमातून खोपोली येथील डॉं. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात 6 वर्षांपासून पुरविण्यात येणारे दोन वेळचे नि:शुल्क भोजन व खोपोली परिसरात अंतिम विधीसाठी उपलब्ध असणारी स्वर्गरथ सेवा चालविण्यात अग्रेसर आहेत. लैंगिक शिक्षणाचे व सायबर क्राईमचे धडे तसेच आदिवासी समुपदेशन, समाज जागृतीमध्ये अग्रेसर आहेत. याशिवाय सहज सेवेचे अन्य वर्षभर चालणारे उपक्रम समाजाचे ऋण आहेत हे मानून काम करतात.
रायगड पोलिस यांच्या वतीने आयोजित 25 ऑक्टोबर 2023 रोजी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते रायगड जिल्हा नवदुर्गा या मानाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. भारताचा 78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल इशिका शेलार यांचा शिवसेना (उबाठा गट) कर्जत खालापूर विधानसभा यांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून आमदार महेंद्रशेठ थोरवे फाऊंडेशनच्या वतीने दि. 5 सप्टेंबर 2024 रोजी कर्जत येथे मावळचे खासदार श्रीरंग बारणे, कर्जत खालापूर तालुक्याचे आमदार महेंद्र थोरवे, शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे तसेच पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आदर्श शिक्षिका म्हणून विशेष सन्मानाने सन्मान करण्यात आला.
खालापूर तहसील, पंचायत समिती खालापूर तसेच खोपोली नगरपरिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात आल्या आहेत. दि. 22 सप्टेंबर 2024 रोजी ताज हॉटेल, मुंबई येथे शानदार कार्यक्रमात IEA च्या वतीने सिनेसृष्टीतील प्रख्यात डायरेक्टर धीरज कुमार यांच्या हस्ते व प्रमुख सन्मानिय व्यक्ती यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
समाजाचे ऋण मानून कार्यरत राहताना समाजातील विविध घटकांना मदत करणे तसेच भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी विशेष प्रयत्न करण्याचा संकल्प सहज सेवा फाऊंडेशनच्या उपाध्यक्षा तसेच खोपोली पोलिस संचलित महिला दक्षता कमिटीच्या इशिका शेलार यांनी व्यक्त केला आहे. समाजातील विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून मान्यवरांनी भविष्यातील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.