कर्जत / मानसी कांबळे :- कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने आज शनिवार, 28 सप्टेंबर रोजी कर्जत शहरात अनेक वर्षांपासुन प्रलंबित असणाऱ्या समस्यांबाबत नगर परिषद प्रशासनासोबत चर्चा करण्यात आली. यापूर्वी कर्जत नगर परिषदेच्या भोंगळ कारभाराविरोधात कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने मुख्याधिकारी वैभव गारवे यांना शहरातील 31 मागण्यांचे निवेदन देण्यात आले होते. संबंधित मागण्यावर कार्रवाई न झाल्यास 2 दिवसांत आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता, याच अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
कर्जत शहर बचाव समितीचे ॲंड. कैलास मोरे तसेच नागरिक यांनी मुख्याधिकारी वैभव गारवे, पाणी पुरवठा अभियंता, आरोग्य अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख यांच्यासोबत चर्चा केली. या बैठकीत मागील 3 वर्षांपासुन असलेल्या पाणी समस्या, कचरा संकलन, घंटागाड्या वेळेवर येत नाहीत, भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात, औषध फवारणी, धुर फवारणी, नदी परिसर स्वच्छता या प्रमुख मागण्यांवर उत्तरे विचारण्यात आली. आम्ही वेळेवर घरपट्टी, पाणीपट्टी भरून देखील योग्य त्या सोयी सुविधा का मिळत नाहीत? असा संतप्त सवाल कर्जत शहर बचाव समिती व नागरिकांकडून विचारण्यात आले. या सर्व मागण्यांवर येत्या 8 दिवसांत योग्य ती कार्रवाई केली जाईल, असे लेखी आश्वासन मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी दिले.