खोपोली / प्रतिनिधी :- गणेशोत्सवाचा ताण ओसरल्यानंतर नवरात्रीचा उत्सव तोंडावर असताना पोलिस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी आवश्यक असल्याचे लक्षात घेऊन खोपोली पोलिस स्टेशनमध्ये एमजीएम मेडिकल कॉलेज कामोठे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. खालापूर तालुका उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खोपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शितल राऊत यांनी पुढाकार घेऊन आरोग्य शिबिराची संकल्पना प्रत्यक्षात साकारली.
पोलिस स्टेशनमधील सर्व अधिकारी आणि कर्मचारी, बोरघाट वाहतूक पोलिस यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी, महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान, अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे सदस्य, खोपोली पोलिस स्टेशनशी संबधित कामगार वर्ग आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय आदींची आरोग्य तपासणी या निमित्ताने केली गेली. हृदयरोग, डायबिटीस आणि अन्य आरोग्य विषयक तपासण्यांसोबत, औषधोपचार आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्फत सल्ला देण्यात आला.
आरोग्य तपासणी ही पोलिस यंत्रणेसाठी अनिवार्य आहे मात्र नेमका त्यासाठी कामाच्या व्यापातून वेळ काढता येत नसल्याने, कामाच्या ठिकाणीच हे आयोजन करण्याचे उद्दिष्ठ साध्य केल्याचा मनोदय पोलिस निरिक्षक शितल राऊत यांनी व्यक्त केला.

