* प्रशासनाने तोडलेली भिंत पुन्हा बांधली
* खालापूर तहसील प्रशासन दखल घेणार ?
रायगड / नरेश जाधव :- खालापूर तालुक्यातील वावर्ले तलाठी सजा अंतर्गत येत असलेल्या पाली बुद्रुक या भागात कोकणातील चव्हाण कुटुंब १९७७ साली वसले असून त्यांनी या भागात शेतीसाठी जागा घेतली होती. हा भाग कर्जत व खालापूर असा दोन्ही तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे चव्हाण यांची अधिक जागा ही खालापूर तालुक्यात येते. चव्हाण कुटुंबाची आज येथे १० एकर जागा आहे. तर त्यातील ५ एकर जागेमध्ये ते लागवड करतात. दत्ताराम चव्हाण यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी सुलोचना चव्हाण यांनी शेतीची धुरा सांभाळली. खालापूर तालुक्यातील पाली बुद्रुक येथील सर्व्हे नंबर ९४, ९५ व ९९ अशी शेत मिळकत सुलोचना चव्हाण, अल्का चव्हाण समेळ, किशोर चव्हाण, नरेश चव्हाण, सरिता चव्हाण, सायली गावकर यांच्या नावावर आहे. शेतीशी चव्हाण कुटुंबाची नाळ जोडली गेली असल्याने गेले अनेक वर्षे संकटांवर मात करीत हे कुटुंब शेती सांभाळून आहे. घरात इंजिनियर, पोलीस निरीक्षक, खाजगी नोकरीत उच्च अधिकारी अशी पद सांभाळणारी ही माणसे आजही शेतीत रमतात. तर ७७ वयाच्या सुलोचना चव्हाण या आजही शेती करतात हे विशेष. दरम्यान, चव्हाण कुटुंबाच्या शेती लगतच वीरेन आहुजा यांचा ओरलँडर (सॉल्ट) रिसॉर्ट आहे. या रिसॉर्टमध्ये आहुजा यांनी सन २०२१-२२ च्या दरम्यान काही बदल करत तलावाची निर्मिती केली. मात्र यासाठी त्यांनी नैसर्गिक पाण्याचे प्रवाह खंडित केले आणि याचा फटका चव्हाण यांना बसला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नैसर्गिक पाणी प्रवाह थांबवत तलाव बांधला असून कालांतराने निचरा होणारे पाणी अडविले. त्याठिकाणी तलाव बंधारा बांधला असून तलावाच्या निचऱ्याचे पाणीही अडविल्याने तलाव काटोकाट भरल्यावर हे पाणी भरल्याने मागे फिरून समेळ चव्हाण यांच्या शेतात जाऊन अडीच एकर शेतीचे नुकसान होत आहे. पावसाळ्यात तलावाचे पाणी व त्यांच्या शेतातील पाणी समेळ - चव्हाण यांच्या शेतात जाऊन सुमारे अडीच एकर शेतीचे नुकसान झाले आहे.
अलका समेळ-चव्हाण यांनी याबाबत खालापूर तहसीलदार यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती, खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांनी २८ डिसेंबर २०२३ रोजी संबंधित यांची संयुक्त बैठक घेऊन शेतकरी यांचे नुकसान भरपाई व केलेले अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते, परंतु त्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने अलका समेळ चव्हाण यांनी रायगड जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला होता. तरीही प्रशासन ढिम्म असल्याने अलका समेळ चव्हाण व त्यांची ७७ वर्षांची आई सुलोचना चव्हाण व यांनी ७ जून २०२४ रोजी उपोषणाला सुरुवात केली. अखेरीस या उपोषणाची दखल घेऊन खालापूर तहसीलदार आयुब तांबोळी यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांनी येऊन तलावाची भिंत तोडण्याचे आदेश दिल्यावर हे अनधिकृत बांधकाम तोडण्यास सुरुवात झाली. तसेच यावेळी प्रशासनासमोर चव्हाण यांच्या शेतीचे माझ्याकडून नुकसान होणार नाही असा शब्द त्यांनी दिला. मात्र त्यानंतर पुन्हा त्यांनी तोडलेली भिंत बांधल्याने हाच प्रकार समोर आला आहे. प्रशासनाचे आदेश याच तलावात बुडवत आहुजा यांनी पुन्हा बांधकाम केले, त्यामुळे यंदा पुन्हा चव्हाण यांच्या शेतीचे नुकसान झाले आहे. १२ महिने शेती करणारे आम्ही शेतकरी यामुळे चिंतीत झालो आहोत. आज शेतीकडे शेतीकरी पाठ फिरवत असताना आम्ही आमची शेती जोपासून आहोत ही आमची चूक का ? शेतकऱ्याने कायम अन्याय सहन करायचा का ? असा जळजळीत सवाल अलका समेळ चव्हाण यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला आहे.
दरम्यान, आहुजा यांनी आपल्या रिसॉर्टमध्ये काय करावे, हा त्यांचा प्रश्न असला तरी कायद्यानुसार नैसर्गिक नाल्यांची वाट अडवणे आणि ती बदलणे हे चुकीचे आहे. तर खालापूर तहसीलदार यांनी दिलेल्या आदेशाला देखील आहुजा यांनी तिलांजली दिल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे. तेव्हा आता महसूल प्रशासन अशा मुजोर धनदांडग्याला कायद्याचा झटका देणार का ? असा प्रश्न निर्माण झाला असून याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. तर विरेन आहुजा यांच्या रिसॉर्टमध्ये असलेले तलाव यांची त्यांनी उंची वाढवली. तर एक तलाव त्यांनी बुजविला, त्यामुळे माथेरानच्या डोंगरातून येणारे नैसर्गिक पाणी याची वाट अडून ते पाणी आमच्या शेतात शिरते. यावर तक्रारी करून उपोषण देखील आम्ही केले होते. त्यानंतर संबंधितांवर महसूल विभागाकडून कारवाई करण्यात आली. मात्र त्यानंतर पुन्हा आहुजा यांच्याकडून तलावाचे तोडलेले बांधकाम करण्यात आले. त्यामुळे यावर्षी पुन्हा आमच्या शेतात पाणी शिरून भात पीक उद्ध्वस्त झाले आहे. आमच्या शेतीचे नुकसान करून ही जमीन बळकाविण्याचा त्यांचा प्रयत्न असू शकतो. मात्र आम्ही शेतकरी आहोत, शेती ही आमची आवड असल्याने इतकी वर्ष शेती सांभाळली. धनाड्यांकडून आजवर अनेकदा शेतकऱ्यांना त्रास देण्यात आला आहे. यावर शासनाने कारवाई करीत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी आमची मागणी आहे. अन्यथा शेतकऱ्यांना कोणी वाली नाही अशी शेतकऱ्यांची धारणा होईल, अशी पिडीत शेतकरी अलका समेळ चव्हाण यांनी पत्रकाराना प्रतिक्रिया दिली.