कोर्लई / राजीव नेवासेकर :- मुरुडची हिंदू एज्युकेशन सोसायटी व भोसला मिलिटरी एज्युकेशन सोसायटी यांचे समान उद्दिष्ट असून शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून संस्कारक्षम माणूस व सशक्त समाज घडवून या भारतभूमीला विश्वगुरुचे स्थान प्राप्त व्हावे, असे प्रतिपादन मुरुड येथील क्षत्रिय माळी समाज हॉलमध्ये ओंकार विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयातील इ.११ वीच्या विज्ञान शाखेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी एअर मार्शल डॉं. अजित भोसले यांनी केले .
विद्यार्थ्यांनी केवळ हुषारी नाही तर चाणाक्ष ही राहिले पाहिजे. परशुरामाच्या या कोकण भूमीत चिकाटी, संयम आणि सर्मपण हा स्थायीभाव अधोरेखित करण्यायोग्य असल्याचे सांगून कोकण किनारपट्टीवरील सामुद्रिक संसाधनेच शिक्षणाद्वारे विकसित होतील आणि परिवर्तन घडवतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी शैक्षणिक संस्थेला शुभेच्छा दिल्या.
सरखेल कान्होजी आंग्रे याचे वंशज तथा रा. स्व. संघ रायगड विभाग संघचालक रघुजीराजे आंग्रे, भोसलाचे कार्याध्यक्ष ॲंड. अविनाश भिडे, सरकार्यवाह हेमंत देशपांडे, स्थानिक समिती अध्यक्ष संजय पगारे, हिंदू एज्युकेशन सोसायटीचे कोषाध्यक्ष मनोहर गुरव, सचिव सुनील विरकुड, विश्वस्त दीपाली जोशी आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
नासिक येथे भोसला मिलिटरीची मुहूर्तमेढ डॉं. बाळकृष्ण मुंजे यांनी १९३५ मध्ये रोवली असून आज १६० एकर परिसरात केजी टू पीजी तसेच रिसर्च व मॅनेजमेंट पर्यंतचे शिक्षण संकुलात हजारो विद्यार्थी राष्ट्रभक्तीचे धडे घेत आहेत, त्याच धर्तीवर मुरुड येथे सैनिकी शिक्षणासह समुद्री साहसी प्रशिक्षणाचे संकुल उभे रहावे. यासाठी प्रयत्नशील असल्याचे सरकार्यवाह हेमंत देशपांडे यांनी सांगुन स्थानिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी ॲंड. अविनाश भिडे, रघुजी राजे आंग्रे यांनी आपले विचार मांडले.
सुनिल विरकड यांनी आपल्या प्रास्ताविकात हिंदू एज्युकेशन सोसायटीचा खडतर प्रवास कथन करून चिकाटीने ही संस्था पुढे नेण्याचा प्रयत्न करीत असल्याचा उल्लेख केला. संस्थेच्या उत्तरोत्तर प्रगतीसाठी डॉं. मंगेश पाटील यांनी ५१ हजार, विनोद भगत यांनी ११ हजार व सुधीर पाटील यांनी १३२२१ रुपयांची देणगी यावेळी सुूपूर्द केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जोशी यांनी तर मनोहर गुरव यांनी आभार मानले.
