* निराधार वृद्धांच्या चेहऱ्यावर समाधानाचा आनंद दिसला
खालापूर / प्रतिनिधी :- सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण घालून देत व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या खालापूर तालुका महिला अध्यक्षा आणि शिवमती ताराराणी ब्रिगेड खालापूर तालुका अध्यक्षा किशोरीताई चेऊलकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आदित्य वृद्धाश्रम, महड येथे एका आगळ्यावेगळ्या सेवाभावी उपक्रमाचे आयोजन केले होते.
कार्यक्रमाच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील निराधार वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. फळे व खाऊ वाटप करताना वृद्धांच्या चेहऱ्यावरील समाधान व आनंद स्पष्टपणे दिसत होता. किशोरीताई यांनी वृद्धांशी जिव्हाळ्याने संवाद साधला आणि त्यांना आपल्या कुटुंबाचा भाग असल्याची जाणीव करून दिली.
या सेवाभावी उपक्रमात व्हॉईस ऑफ मीडिया जिल्हाध्यक्ष अभिजीत दरेकर, खालापूर तालुका अध्यक्ष दिपक जगताप, पत्री सरकार संपादक सचिन यादव, वृद्धाश्रम व्यवस्थापक मीरा जावळे, कृष्णकांत चेऊलकर, आकाश चेऊलकर, अंकिता चेऊलकर, आरोही चेऊलकर, दर्शन चेऊलकर यांची विशेष उपस्थिती होती.
किशोरीताई चेऊलकर यांच्या या उपक्रमामुळे वृद्धाश्रमात फक्त फळे आणि खाऊच नाही, तर प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी वाटप करण्यात आली. त्यांच्या या सेवाभावामुळे खालापूर आणि महड परिसरातील लोकांमध्ये सामाजिक कार्याबद्दल आदराची भावना निर्माण झाली आहे. वृद्धाश्रम व्यवस्थापनाने या सेवाभावी उपक्रमाबद्दल किशोरीताई चेऊलकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष आभार मानले. त्यांच्या या कार्याने खऱ्या अर्थाने सामाजिक कार्य कसे करावे, याचा आदर्श निर्माण केला आहे. सामाजिक परिवर्तनाचा वसा घेतलेल्या चेऊलकर यांचा हा उपक्रम नक्कीच समाजातील इतरांना प्रेरणा देईल. त्यांच्या पुढील उपक्रमांसाठी परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि पाठिंबा दिसून येत आहे.